पुणे : शहरासह पिंपरी-चिंचवड आणि उपनगरात सार्वजनिक वाहतूक सुलभ उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने माॅल, शाळा, रुग्णालये, खासगी कंपन्या आणि गर्दीच्या ठिकाणांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. आवश्यकतेनुसार संबंधित ठिकाणच्या प्रशासनाबरोबर करार करून सेवा पुरविण्यात येणार आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
पुण्यात जवळपास शंभराहून अधिक मोठे माॅल्स असून, सुमारे ४५० पेक्षा अधिक शाळा-महाविद्यालये, तर २०० पेक्षा अधिक नामांकित रुग्णालये आहेत. सिंहगड किल्ला, शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, भुलेश्वर मंदिर, भारतीय चित्रपट आणि टेलीव्हिजन संस्था, बालाजी मंदिर (नसरापूर) अशा अनेक ऐतिहासिक स्थळांसह धार्मिक आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळे आहेत. या ठिकाणी नियमित गर्दी असते. यापैकी बहुतांश ठिकाणी ‘पीएमपी’ची सेवा पुरवली जाते. या मार्गांवरून पीएमपी धावत असली, तरी प्रवाशांची वाढती गर्दी पाहता सुकर प्रवास करता यावा, म्हणून पीएमपी प्रशासनाने गर्दीची आणखी ठिकाणे शोधण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती ‘पीएमपी’च्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.
मुंडे म्हणाल्या, ‘पीएमपीच्या ताफ्यात नव्याने ६०० बस दाखल करून घेण्यासाठी सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्यानुसार आतापर्यंत ८५ बस दाखल झाल्या असून, कंत्राटदारांकडून आणखी बस येतील. यामध्ये स्वमालकीच्या २०० बस दाखल करून घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार नवीन मार्गिकांच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. शहरातील माॅल, रुग्णालये, शाळा-महाविद्यालयांमध्ये नियमित गर्दी वाढत आहे. बहुतांश ठिकाणी ‘पीएमपी’ची सेवा असली, तरी तेथील कर्मचाऱ्यांना सेवा उपलब्ध करून दिल्यास फायदा होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.’
खासगी कंपन्यांबरोबर करार
‘माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (आयटी पार्क), खासगी कार्यालये व कारखान्यांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू करण्याची योजना आखण्यात येणार असून, कंपन्यांच्या वेळापत्रकानुसार पूरक सेवा चालविण्यात येईल. त्यासाठी कंपन्यांबरोबर करार करण्यात येणार आहे,’ असे मुंडे यांनी सांगितले.
मॉल्स आणि गर्दीच्या ठिकाणांसाठी विशेष व्यवस्था
फिनिक्स मार्केट सिटी, ॲमेनोरा, पीएमसी मार्केट अशा ठिकाणी सुटीच्या दिवशी जास्त गर्दी असते. या भागात विशेष वेळापत्रकानुसार बस सेवा वाढवण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी नमूद केले.