पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात वाढत असलेल्या उष्णतेमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली असून, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव पूर्णपणे कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने तापमानात वाढ होत आहे. पुण्यासह राज्यभरातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमाना ३० अंश सेल्सियसपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. मार्च महिना सुरू झाल्यामुळे आता उन्हाळ्याचा मोसम सुरू झाला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार सोमवारी (२ मार्च) कोरेगाव पार्क येथे ३५.७, शिवाजीनगर येथे ३५.३, तळेगाव येथे ३५.२ अंश सेल्सियस, तर मंगळवारी (३ मार्च) शिवाजीनगर येथे ३५.५, लोहगाव येथे ३६.४, चिंचवड येथे ३५ अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदवण्यात आले.

राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने, तर उर्वरित राज्यभरात २ ते ४ अंश सेल्सियस, तसेच दक्षिण महाराष्ट्रात २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, राज्यातील कमाल तापमानामध्ये वाढ होत आहे. प्रामुख्याने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड येथील कमाल तापमान वाढत आहे. किमान तापमानामध्ये घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. तसेच पुण्यातही कमाल तापमानात वाढ होऊ शकते.

दरम्यान, हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी राज्यात अकोला येथे सर्वाधिक ३८.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे ३७.२, कोल्हापूर येथे ३४.९, मालेगाव येथे ३५.२, सातारा येथे ३५.९, सोलापूर येथे ३८, कोकणातील रत्नागिरी येथे ३४.५, मुंबई येथे ३०.६, डहाणू येथे ३१.८, मराठवाड्यातील धाराशिव येथे ३५.७, छत्रपती संभाजीनगर येथे ३६.२, परभणी येथे ३७.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील बुलढाणा येथे ३६.२, ब्रह्मपुरी येथे ३७.२, चंद्रपूर येथे ३५.७, गोंदिया येथे ३५, नागपूर येथे ३६.२, वर्धा येथे ३८.५, यवतमाळ येथे ३५.२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.

तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ४ आणि ५ मार्च रोजी ठाणे आणि रायगड येथे, तर ४ मार्च रोजी ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.