पुणे : बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या आर्द्रतेमुळे मध्यम ते उंच ढगांची निर्मिती होत आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यभरात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे आता उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहेउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव आता कमी झाला आहे. त्यामुळे थंडी कमी होऊन गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होत आहे.

पुण्यासह राज्यभरात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० अंश सेल्सियसपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे विदर्भातील काही ठिकाणी ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस राज्यभरातील तापमान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

किमान आणि कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ होऊ शकते. पुणे आणि परिसरात हवामान निरभ्र राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून आर्द्रतायुक्त वारे येत आहेत. त्यामुळे पुण्यासह काही ठिकाणी मध्यम ते उच्च ढगांची निर्मिती होत आहे. परिणामी, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण येथे रात्री आणि दिवसाचे तापमान तुलनेने जास्त राहण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी पुण्यात ३२.७, कोल्हापूर येथे ३२.२, नाशिक येथे ३२, रत्नागिरी येथे ३२, छत्रपती संभाजीनगर येथे ३१.२, परभणी येथे ३२.७, अकोला येथे ३५.१, अमरावती येथे ३५.२, बुलढाणा येथे ३३.३, ब्रह्मपुरी येथे ३५.६, नागपूर आणि गोंदिया येथे ३२.४, चंद्रपूर येथे ३३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबई येथे २८.४, अलिबाग येथे २७.८, डहाणू येथे २९.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.

२०१४ नंतरचे तिसऱ्या क्रमांकांचे तापमान

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीच्या पूर्वार्धात पुण्यातील शिवाजीनगर येथे सरासरी किमान तापमान १४.२ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. २०१४नंतरचे हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक किमान तापमान ठरले आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीतील आजवरचे सर्वाधिक ३५.८ अंश सेल्सियस तापमान ४ फेब्रुवारी १९६७ रोजी नोंदवले गेले होते. त्या खालोखाल ४ फेब्रुवारी १९५४ रोजी ३५अंश सेल्सियस, तर २३ फेब्रुवारी २०१२ रोजी ३४.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती.