पुणे : महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करुन तिला त्रास, तसेच विनयभंग करणाऱ्या सडक सख्याहरीला येरवडा पोलिसांनी अटक केली. साहिल याकुब सय्यद (वय २४, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत युवतीच्या बहिणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी सय्यद हा जानेवारी महिन्यापासून युवतीचा पाठलाग करत होता. तो महाविद्यालयाच्या आवारात गेला. युवतीला धमकावून त्याने तिला मोटारीस बसण्यास सांगितले. त्याने युवतीबरोबर छायाचित्र काढले, तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. सय्यद याच्या त्रासामुळे घाबरलेल्या युवतीने या घटनेची माहिती मोठ्या बहिणीला दिली. त्यानंतर बहिणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सय्यद याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक देवकर तपास करत आहेत.

शाळकरी मुली, महाविद्यालयीन युवतींना त्रास दिल्यास त्यांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.