पुणे : सकल विघ्नांचे हरण करून सर्वांच्या जीवनामध्ये आनंद देणाऱ्या श्री गणरायाच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता लागली असून, सोमवारी (१४ सप्टेंबर) वाजतगाजत गणरायाची प्रतिष्ठापना करण्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. मानाच्या गणपतींची मुहूर्तावर प्रतिष्ठापना होणार आहे. प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथके, तसेच बँडपथकांना निमंत्रण देण्यापासून पूजा साहित्याची खरेदीपर्यंतच्या नियोजनामध्ये कार्यकर्ते व्यग्र झाले आहेत. तिथीच्या वृद्धीमुळे यंदाचा गणेशोत्सव बारा दिवसांचा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आनंदाचे भरते आले आहे.

श्री कसबा गणपती मंडळ

ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक सकाळी सव्वाआठ वाजता उत्सव मंडपातून निघणार आहे. मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांच्या कलानिकेतन स्टुडिओ येथून घेतलेली गणरायाची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये विराजमान करून ही मिरवणूक उत्सव मंडपात पोहोचेल. प्रभात बँड, संघर्ष ढोल-ताशा पथक, ज्ञानप्रबोधिनी युवक विभाग, शौर्य ढोल-ताशा पथक मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. वाराणसी येथील सांगवेद विद्यापीठात ‘दंडक्रम पारायण’ यशस्वीरीत्या पूर्ण केलेले १९ वर्षीय वेदमूर्ती देवव्रत रेखे यांच्या हस्ते सकाळी पावणेबारा वाजता श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ

मानाचा दुसरा ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची मिरवणूक चांदीच्या पालखीतून सकाळी दहा वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील मंदार लाॅज येथून उत्सव मंडपाकडे निघणार आहे. या मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, ताल ढोल-ताशा पथक, विष्णूनाद शंख पथक सहभागी होणार आहे. कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे मिरवणूक उत्सव मंडपात पोहोचेल. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे विश्वस्त योगी निरंजननाथ गुरू शांतिनाथ यांच्या हस्ते दुपारी सव्वाबारा वाजता श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यंदा मंडळाने साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

श्री गुरुजी तालीम मंडळ

श्री गुरुजी तालीम मंडळ या मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी अकरा वाजता गुरुजी तालीम गणपती मंदिरापासून निघणार आहे. स्वप्निल आणि सुभाष सरपाले या बंधूंनी साकारलेल्या फुलांच्या आकर्षक रथातून ही मिरवणूक निघणार असून, या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँडपथक, गुरुजी प्रतिष्ठान, शिवतेज, शिवरुद्र, शिव ताल, रुद्रतेज, कलावंत ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत. गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौकमार्गे मिरवणूक उत्सव मंडपात आल्यानंतर दुपारी एक वाजून ५५ मिनिटांनी उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे.

श्री तुळशीबाग मंडळ

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे आगमन रविवारीच (१३ सप्टेंबर) उत्सव मंडपात होणार आहे. उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजता गणपती मंदिरापासून मिरवणूक सुरू होणार असून, गणपती चौक, लक्ष्मी रस्ता, नगरकर तालीम चौक, बाजीराव रस्ता, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी गणपती, मजूर अड्डा चौक, बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे उत्सव मंडपात येईल. अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

केसरीवाडा गणेशोत्सव

केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचव्या गणपतीची मिरवणूक सकाळी नऊ वाजता रमणबाग चौकातून प्रथेप्रमाणे पालखीतून सुरू होणार आहे. बिडवे बंधू यांचा सनई-चौघडावादनाचा गाडा, श्रीराम पथक आणि कलावंत ढोल-ताशा पथकांचा समावेश असेल. शिंदे पार चौक, ओंकारेश्वर मंदिर, वर्तक उद्यान, नारायण पेठ पोलीस चौकी, न. चिं. केळकर रस्त्याने मिरवणूक उत्सव मांडवात दाखल होईल. रौनक रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी पावणेबारा वाजता गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. वेदमूर्ती कौस्तुभ खळीकर पौराहित्य करणार आहेत. केसरी गणेशोत्सवाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, उत्सवाच्या संयोजक डॉ. गीताली टिळक, विश्वस्त प्रणति रोहित टिळक उपस्थित असणार आहेत.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणरायाची दुपारी साडेबारा वाजता प्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी सकाळी सव्वाआठ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन येथून मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. बुधवार चौक, तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्तामार्गे मिरवणूक उत्सव मंडपात पोहोचेल. मिरवणुकीत विविध झोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत.

अखिल मंडई मंडळ

फुलांनी सजविलेल्या भव्य पुष्परथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची मिरवणूक सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. अखिल मंडई मंडळाचे समाज मंदिर, मंडई पोलीस चौकी, रामेश्वर चौक, गोटीराम भैया चौक, मेट्रो स्टेशन मार्गे मिरवणूक उत्सव मंडपात पोहोचेल. न्यू गंधर्व बँडपथक, समर्थ आणि तालचक्र ढोल-ताशा पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहे. मंडळाने साकारलेल्या हरिहर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये डॉ. विनय थोरात आणि प्रतिभा थोरात यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता शारदा-गजाननाची प्रतिष्ठापना होणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून सकाळी साडेआठ वाजता गणपती मंदिरापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक सुरू होणार आहे. अप्पा बळवंत चौक, लिंबराज महाराज चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे मिरवणूक उत्सव मंडपात येणार आहे. गंधाक्ष ढोल-ताशा पथक, मयूर बँड, प्रभात बँड आणि दरबार बँड मिरवणुकीत सहभागी होणार आहे. उत्तर प्रदेश वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.