पुणे : महात्मा फुले मंडईच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणांवर गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. मंडई परिसरातील अनधिकृत पत्राशेड, पथारी व्यावसायिक यांच्यावर कारवाई करून महापालिकेने हा रस्ता रिकामा केला. महापालिकेच्या या कारवाईमुळे कारवाई करणाऱ्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
गेल्या आठवड्यात या भागात पाहणीसाठी आलेल्या महापालिका आयुक्तांनी रस्त्यांवर अतिक्रमणे होऊ देऊ नका, नागरिकांना तसेच गणेशोत्सावासाठी या परिसरात येणाऱ्या भाविकांना अतिक्रमणांचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर महापालिकेने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. गणेशोत्सवाच्या निमित्ताने या परिसरात मोठी गर्दी नागरिकांची होत होती. रस्त्यांवरून चालणेही अवघड झाले होते. मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली असतानाही प्रशासन मात्र शांत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
महात्मा फुले मंडई आणि परिसरातील रात्री साडेदहाच्या सुमारास अनेक दुकाने बंद झाली असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथे कारवाई केली. या परिसरात अतिक्रमणे झाली असल्याचा साक्षात्कार महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांना झाला. रस्त्यावर झालेल्या या अतिक्रमणांमुळे नागरिकांना चालणेही अवघड होत असल्याची बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यानंतर तातडीने सूत्रे फिरली.
जेसीबी तसेच अन्य यंत्रांच्या साह्याने अनधिकृत पत्राशेड, दुकाने काढण्यास सुरुवात केली. त्या वेळी नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. ऐन सणासुदीच्या काळात कारवाई करून आर्थिक नुकसान होत असल्याने त्याला विरोध झाला. मात्र, महापालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्त लावत ही कारवाई पूर्ण केली. यामध्ये काही पत्र्यांची दुकाने, स्टॉल, हातगाड्या, अनधिकृत कठडे यांच्यावर कारवाई करून रस्ते मोठे करण्यात आले.
महात्मा फुले मंडई आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून खरेदीसाठी गर्दी होत आहे. या भागात पीएमपी बससह चारचाकी, दुचाकी, ॲटोरिक्षा यांचीही वाहतूक सुरू असल्याने कोंडीत भर पडते. मंडई पोलीस चौकी ते अखिल मंडई गणपती आणि टिळक पुतळा ते काका हलवाई या दरम्यानही पथारी व्यावसायिकांनी रस्ते अडवलेले होते.
महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर म्हणाले की, मंडई परिसरात व्यापाऱ्यांनी अधिक जागा व्यापली होती. हातगाड्यांचा परवाना असणाऱ्या व्यापाऱ्यांनी बेकायदा पत्र्याचे शेड, ताडपत्री मारून मोठी दुकाने उभी केली होती. उत्सवकाळात होणारी गर्दी लक्षात घेता ही अतिक्रमणे काढण्याची सूचना पोलिसांनी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने रविवारी रात्री मंडई भागात कारवाई करून अतिक्रमणे काढून टाकली.
