पुणे : ‘कथा हा फसवा वाङ्मय प्रकार आहे. कधी हातातून निसटून जाईल कळत नाही. कथेचा गोळीबंद अनुभव शब्दांमध्ये मांडणे कष्टाचे काम आहे. एखादा छानसा मोत्यांचा घोस कधीही हाताशी लागू शकतो. या शोधात माझाही प्रवास सुरू आहे,’ अशी भावना ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी मंगळवारी व्यक्त केली.

विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या वतीने शंकर पाटील, प्रा. द. मा. मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर या कथाकारांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘स्मरण तीन कथाकारांचे’ या कार्यक्रमात गोडबोले यांना ‘कथाकार सन्मान’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रसिद्ध लेखक प्रा. मिलिंद जोशी, कोहिनूर समूहाचे कृष्णकुमार गोयल आणि विदिशा विचार मंचच्या ममता क्षेमकल्याणी या वेळी उपस्थित होत्या.

गोडबोले म्हणाल्या, ‘मराठी साहित्याचे दालन द. मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या तीन दिग्गज कथाकारांनी समृद्ध केले. या तिन्ही कथाकारांची कथाकथन करण्याची आपापली बलस्थाने होती. सभोवतालची माणसे आणि त्यांचे जगणे केवळ आम्ही मांडत आलो, अशी या तिघांची प्रांजळ भावना होती.’

‘विनोदी साहित्य प्रकार ग्रामीण जीवनातल्या अस्सल मराठी घडामोडींशी जोडून मराठी विनोदाचे वर्तुळ व्यापक करण्याचे काम तिघांनी केले. कथाकथन ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. कथाकथनासाठी वक्तृत्व, साहित्य आणि नाट्य लागते,’ असे मिलिंद जोशी म्हणाले.

यानिमित्ताने अक्षय प्रभाकर वाटवे यांनी व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘मारुतीराय’, अमृत सामक यांनी शंकर पाटील यांच्या ‘हिशेब’, तर श्रीधर कुलकर्णी यांनी द. मा. मिरासदार यांच्या ‘भोकरवाडीतील गावगुंडी’ या कथेचे अभिवाचन केले.