पुणे : शाळेत कराटेच्या सरावादरम्यान १० वर्षांच्या मुलीला पोटात मार लागला. तिच्या पोटात तीव्र दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या तपासणीत स्वादुपिंडाच्या सॉलिड स्युडोपॅपिलरी निओप्लाझम या दुर्मीळ कर्करोगाचे निदान झाले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही गाठ य़शस्वीरीत्या काढून टाकली. विशेष म्हणजे, या मुलीमध्ये कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती मात्र, कराटे सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याचे वेळेवर निदान आणि उपचार शक्य झाले.

ही मुलगी नियमितपणे शाळेत जात होती परंतु, तिला कोणताही त्रास होत नव्हता. तिच्यात आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती. ती दैनंदिन कामे व्यवस्थितपणे करीत होती. मात्र, शाळेत कराटेच्या सरावादरम्यान तिच्या पोटात दुखापत झाली. त्यानंतर तिला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तिला तातडीने बाणेरमधील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात केलेल्या तपासणीत स्वादुपिंडाचा सॉलिड स्युडोपॅपिलरी निओप्लाझम या कर्करोगाचे निदान झाले.

याबाबत रुग्णालयातील कर्करोगतज्ज्ञ डॉ. अमित पारसनीस म्‍हणाले  की, या मुलीच्या स्वादुपिंडाच्या रचनेचे नीट निरीक्षण केल्यानंतर आम्ही सेंट्रल पॅनक्रिएटॉमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग आणि स्वादुपिंडाचा काही भाग सुरक्षित राखता आला. स्वादुपिंड हा अवयव शरीरातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांच्या अगदी जवळ असतो आणि लहान मुलांना जास्त रक्तस्राव सहन होत नाही. त्यामुळे ही शस्त्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होती. आम्ही अत्यंत कमी रक्तस्त्रावात ही गाठ सुरक्षितपणे काढून टाकली आणि स्वादुपिंडाचे कार्य कायम ठेवले. ही मुलगी आता पूर्णपणे बरी झाली आहे, तसेच ती पुन्‍हा शाळेत जाऊ लागली आहे.

तरूण महिलांमध्ये प्रामुख्याने बाधा

स्वादुपिंडाचा सॉलिड स्युडोपॅपिलरी निओप्लाझम हा कर्करोग हा दुर्मीळ आणि कमी तीव्रतेचा आहे. या कर्करोगाची गाठ पूर्णपणे काढून टाकल्यानंतर रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता जास्त असते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या प्रकारांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण फक्‍त १ ते ३ टक्‍के आहे. हा कर्करोग प्रामुख्याने तरुण महिलांमध्ये आढळतो. साधारणपणे २० ते ३० वयोगटातील महिलांमध्ये तो आढळतो. मात्र, या मुलीमध्ये दहाव्या वर्षीच या कर्करोगाची बाधा दिसून आली. देशातील या कर्करोगाची ही सर्वांत कमी वयाची रुग्ण ठरल्याचा दावा मणिपाल हॉस्टिपलने (बाणेर) केला आहे. 

अनपेक्षित निदानाचा फायदा

स्वादुपिंडाच्या गाठी अनेकदा बराच काळ कोणतीही लक्षणे न दिसता शरीरात राहू शकतात आणि अनेक वेळा इतर कारणांसाठी केलेल्या तपासणीमध्‍ये त्‍यांचे अनपेक्षितपणे निदान होते. अशा दुर्मीळ आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी, विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत वेळेवर केलेली तपासणी आणि उपचार महत्त्वाचे ठरतात, अशी माहिती मणिपाल हॉस्पिटलचे (बाणेर) समूह संचालक आनंद मोटे यांनी दिली.