पुणे : अवघ्या दीड महिन्यांच्या बाळाने चुकून गिळलेली उघडी हेअरपिन पचनसंस्थेत खोलवर अडकल्याने गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, डॉक्टरांनी तातडीने एंडोस्कोपी करून ही हेअरपिन यशस्वीरीत्या बाहेर काढून बाळाचा जीव वाचवला.

घरी खेळत असताना हेअरपिन गिळल्यानंतर सुमारे दोन तासांनी बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तातडीने करण्यात आलेल्या एक्स-रे तपासणीत ही उघडी हेअरपिन पोटाच्या खालच्या भागातून लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागापर्यंत पोहोचल्याचे आढळून आले. हेअरपिन उघडी असल्यामुळे पोट अथवा आतड्याला छिद्र पडण्याचा धोका असल्याने डॉक्टरांनी या प्रकरणाला वैद्यकीय आणीबाणी म्हणून हाताळले.

विशेष प्रकारच्या टूथ फोर्सेप्सच्या साहाय्याने एंडोस्कोपीद्वारे ही हेअरपिन कोणतीही इजा न होता यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आली. या प्रकरणाविषयी माहिती देताना मणिपाल रुग्णालयाचे पोटविकार तज्ज्ञ डॉ. आदित्य बोरावके म्हणाले, ‘प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तातडीने एंडोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला ड्युओडेनमच्या चौथ्या भागात ही हेअरपिन सापडली. योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही गुंतागुंत होण्यापूर्वी ती सुरक्षितपणे बाहेर काढणे शक्य झाले.’

ते म्हणाले, ‘लहान मुलांनी टोकदार किंवा धारदार वस्तू गिळल्यास ती गंभीर वैद्यकीय आणीबाणी ठरू शकते. या प्रकरणात हेअरपिन उघडी असल्याने आतड्याला छिद्र पडण्याचा धोका अधिक होता. वस्तू लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात खूप आतपर्यंत पोहोचल्याने ती नियमित एंडोस्कोपीच्या आवाक्याबाहेर होती. मात्र, काळजीपूर्वक केलेल्या प्रक्रियेमुळे उपचार यशस्वी ठरले.’

प्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती स्थिर होती. चार तासांनंतर त्याला तोंडावाटे आहार देण्यास सुरुवात करण्यात आली. बाळाने आहार व्यवस्थित घेतला आणि दुसऱ्याच दिवशी त्याला पूर्णपणे निरोगी अवस्थेत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या बाळाची प्रकृती उत्तम असून, पुढील तपासण्यांमध्येही कोणतीही गुंतागुंत आढळलेली नाही.