पुणे : नियमित वैद्यकीय तपासणी करण्यासाठी एक ७० वर्षीय वृद्ध रुग्णालयात गेला. त्यावेळी ईसीजी तपासणीत हृदयविकाराचे निदान झाल्याने डॉक्टरांकडून तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. परंतु, अँजिओप्लास्टीनंतर तीनच दिवसांत या वृद्धाच्या लघवीवाटे रक्तस्राव सुरू झाला. त्यावेळी त्याला सुरू असलेली अँटीप्लेटलेट थेरपी यासाठी कारणीभूत असल्याचे समोर आले. मात्र, ही थेरपी बंद करता येत नसल्याने डॉक्टरांपुढे आव्हान निर्माण झाले. अखेर अत्याधुनिक प्रक्रियेद्वारे या वृद्धावर उपचार करण्यात आले असून, तो अखेर सहा महिन्यांनी पूर्णपणे बरा झाला आहे.
या रुग्णाचे वय ७० वर्षे असून, त्यांची नियमित हृदय तपासणी करण्यात आली. त्यावेळी ईसीजी तपासणीत अँजिओप्लास्टी करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले. त्यामुळे रुग्णावर खराडीतील मणिपाल हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर रुग्णावर डुएल अँटिप्लेटलेट थेरपी सुरू करण्यात आली. मात्र तीनच दिवसांत लघवीवाटे रक्त जात असल्याची तक्रार घेऊन हा रुग्ण पुन्हा आला. त्यावेळी केलेल्या तपासणीत रुग्णाच्या मूत्राशयामध्ये जवळजवळ ३०० मिलीची गुठळी आढळली. त्याचबरोबर प्रोस्टेटचा आकारही वाढल्याचे निदर्शनास आले. अँटिप्लेटलेट थेरपी प्रोस्टेटमधून रक्तस्त्राव होण्यास कारणीभूत ठरली होती.
मूत्राशयातील गुठळी काढून टाकण्याची व रक्तस्राव होत असलेल्या रक्तवाहिन्यांवरील फल्गुरेशनची प्रक्रिया तातडीने पार पाडण्यात आली. त्यानंतर रुग्णावर जवळून देखरेख ठेवण्यासाठी त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले. प्रारंभिक हस्तक्षेपानंतरही पुन्हा एकदा गुठळी निर्माण झाली आणि रक्तस्त्राव सुरू राहिला. अँटिप्लेटलेट थेरपी थांबविणे किंवा सुरू ठेवणे या दोहोंमध्येही असलेली जोखीम लक्षात घेता विविध विभागातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या पथकाने या रुग्णाचे मूल्यमापन केले. या प्रकरणातील गुंतागुंत विचारात घेऊन डॉ. संतोष पाटील यांनी कमीत कमी छेद घेऊन प्रोस्टेट आर्टरी अँजिओएम्बोलायझेशनची प्रक्रिया पार पाडली. यामुळे रक्तस्त्रावावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना युरिनरी कॅथेटर बसवून घरी सोडण्यात आले. त्यानंतर सहा महिन्यांनंतर अँटिप्लेटलेट थेरपी थांबवणे सुरक्षित असल्याचे निश्चित झाले. त्यावेळी रुग्णाच्या प्रोस्टेटच्या वाढलेल्या आकारासाठी प्रोस्टटच्या लेझर इन्युक्लिएशनसह त्यांच्यावर अंतिम उपचार करण्यात आले.
रुग्ण लवकर बरा होण्यास मदत
रुग्णाची रक्त पातळ करणारी औषधे थांबवणे शक्य नसल्याने प्रोस्टेटचा आकार वाढण्यासह रक्ताची गुठळी होऊन गुंतागुंतीची स्थिती तयार झाली. पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये मोठा धोका होता. ही गुंतागुंत असूनही कमीत कमी छेद घेऊन प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यात तातडीने रक्ताची गुठळी बाहेर काढणे आणि प्रोस्टेट आर्टरी एम्बोलायझेशन करण्यात आले. त्यानंतर लेझर इन्युक्लिएशनची प्रक्रिया करण्यात आली. याद्वारे शरीरातील रक्तस्त्रावावर नियंत्रण मिळविले गेले आणि रुग्ण लवकर बरा होण्यास मदत झाली, असे मणिपाल हॉस्पिटलमधील (खराडी) मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. अंकित शर्मा यांनी सांगितले.
