पुणे : समाजाला मानसिक आरोग्याविषयी साक्षर करण्यासाठी ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी चित्रपट या प्रभावी माध्यमाची निवड करत २००६ मध्ये ठाण्यात ‘मनतरंग’ या अनोख्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. वाढता प्रतिसाद पाहता नाशिकनंतर आता पुण्यातही ‘मनतरंग फिल्म क्लब’ सुरू होत आहे. विशेष म्हणजे हा प्रवास डॉ. नाडकर्णी यांच्या प्रत्यक्ष सहभागाविना पुढे सरकत असला, तरी मानसिक आरोग्य जनजागृतीच्या या वाटा त्यांच्या विचारांनी आणि त्यांनी तयार केलेल्या कार्यकर्त्यांच्या सक्षम फळीमुळे पुढेही तितक्याच प्रकाशमान राहणार आहेत.

ठाण्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये गेल्या महिन्यात 26 एप्रिल रोजी चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथणकर यांनी मनतरंग कार्यशाळेत चार तासांचे सत्र घेतले . वास्तविक 16 आणि 17 एप्रिल रोजी ही कार्यशाळा नियोजित होती. यामध्ये स्वतः डॉक्टर आनंद नाडकर्णी मार्गदर्शन करणार होते, मात्र तब्येतीच्या कारणास्तव ही कार्यशाळा रद्द करण्यात आली. अखेर 26 एप्रिल रोजी सुनील सुकथणकर यांनी मनतरंग कार्यशाळेचे चार तासांचे सत्र घेतले.

या मनतरंग उपक्रमांतर्गत दर महिन्याला एक सिनेमा किंवा दोन लघुपट दाखवण्यात येणार असून यामध्ये या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या भावना, विचार ,आपल्या समोरची आव्हाने , मानसिकतेच्या विविध छटा हे सगळे मनाचे पैलू उलगडून दाखवण्याचे काम आणि याविषयीची जागरूकता निर्माण करण्याचे काम मनातरंग फिल्म क्लबच्या माध्यमातून होणार आहे.

पुण्यामध्ये दर महिन्याला एक सिनेमा अथवा दोन लघुपट दाखवण्यात येणार असून यामध्ये मनोविकार तज्ञ, मानसशास्त्रज्ञ यासह अनेक तज्ञ सहभागी होणार असून विविध पैलूंवर चर्चा होणार आहे. सिनेमाची केवळ तांत्रिक बाजूच नाही तर मानसिक विश्लेषण करण्यात येणार आहे.

ठाण्यापाठोपाठ नाशिक मध्ये स्वतः आनंद नाडकर्णी यांनी पुढाकार घेत मनतरंग हा उपक्रम सुरू केला. याला सहा वर्ष झाली असून आता पुण्यातही हा उपक्रम सुरू होत आहे. डॉक्टर नाडकर्णी यांनी मनतरंग फिल्म क्लब सुरू केल्यानंतर समाजाच्या अनेक स्तरातून याविषयी विचारणा होऊ लागली. याचा चांगला परिणाम विविध घटकांवर होत असल्याने ठाणे, नाशिक आणि पुणे पाठोपाठ आता लवकरच सोलापूर आणि मुंबईमध्येही मनतरंग हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

मनतरंग भविष्यात सोलापूर आणि मुंबईमध्ये ही सुरू होणार असून याव्यतिरिक्त आयपीएच मध्ये असे अनेक उपक्रम चालू आहेत की जिथे डॉक्टर नाडकर्णींची गरज पडत नव्हती. त्यांनी आम्हा कार्यकर्त्यांची पुढची फळी तयार केली असल्याने त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून मार्गक्रमण करणे हेच ध्येय असणार आहे.
– शैलेश मेदगे ( इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ संस्था व्यवस्थापक, ठाणे)

मनतरंग चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन आमच्या ‘देवराई’ या चित्रपटानं झाले होते. मानसिक आरोग्य जोपासण्यासाठी दृक्- श्राव्य माध्यमांची समजुतदार जाणीव विकसित व्हायला हवी- असं डॅा. आनंद नाडकर्णी यांचं आग्रही म्हणणं होतं. यातूनच पुणे आयपीएचतर्फे कार्यशाळा किंवा फिल्म-क्लबसारखे सातत्यपूर्ण उपक्रम करण्याची त्यांची इच्छा होती. आम्ही सोबत असा कार्यक्रम ठरवलाही होता. त्यांच्या आजारपणामुळे मी तो वेगळ्या स्वरूपात एकट्याने केला. डॅा. आनंदना आपण अचानक गमावून बसलो आहोत. त्यांची पोकळी कशी भरून निघणार ? पण त्यांची जीवनदृष्टी पुढे नेणारे हे उपक्रम पुणे आय पी एच ने ताकदीने पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
-सुनील सुकथणकर, चित्रपट दिग्दर्शक

पुण्यामध्ये 30 मे रोजी आयपीएच मधील जागेतच दोन लघुपट दाखवण्यात येणार आहे. यंदा मुलांचे भावविश्व हा विषय असून यामध्ये द सायलेंट चाइल्ड या चित्रपटा द्वारे संवादासाठी आसुसलेल्या एका चिमुकलीची संघर्षकथा तर सिंग या लघुपटाद्वारे निरागस मैत्री आणि भ्रष्ट व्यवस्थेशी विवेकी लढा या दोन लघुपटांचा मनोवैज्ञानिक दृष्टीने रसास्वाद घेण्यात येणार आहे.