पुणे : अक्षय्य तृतीया दोन दिवसांवर आलेली असताना, आंब्याची आवक कमी प्रमाणात होत असल्याने दरांत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात एक डझन तयार हापूसचे दर प्रतवारीनुसार ८०० ते १२०० रुपयांपर्यंत आहेत, तर किरकोळ बाजारात एक डझन हापूसची विक्री १२०० ते १५०० रुपये दराने केली जात आहे.
अक्षय्य तृतीयेला पूर्वजांना हापूस आंब्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे दर वर्षी अक्षय्य तृतीयेच्या आधी आंब्यांच्या मागणीत वाढ होते. यंदा मात्र हवामान बदलामुळे आंबा लागवडीत मोठी घट झाली. परिणामी, बाजारात मागणीच्या तुलनेत आवक अतिशय कमी होत आहे. विशेषत: तयार हापूसचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.
‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हापूसच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या आगेमागे तयार हापूसची मागणी वाढते. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाजारात कच्च्या आंब्यांची आवक वाढली. कच्चा आंबा पक्व होण्यास वेळ लागतो. ग्राहकांकडून तयार आंब्यांना मागणी आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक डझन तयार हापूसचे दर ८०० ते १२०० रुपयांपर्यंत आहेत,’ अशी माहिती मार्केट यार्डातील आंबा व्यापारी नितीन कुंजीर यांनी दिली.
आंबा व्यापारी करण जाधव म्हणाले, ‘यंदा आंबा उत्पादनाला बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवातीला चांगला मोहोर आला. पण, तापमानातील चढ-उतार, दमट वातावरण, थ्रिप्स, तसेच तुडतुड्या किडीच्या प्रादुर्भावामुळे यंदा मोहोर टिकला नाही. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला हापूसचे एक डझनाचे दर ६०० ते एक हजार रुपयांपर्यंत होते. यंदा त्यात दुपटीने वाढ झाली आहे.’
- घाऊक बाजारातील तयार हापूसचे दर (एक डझन) : ८०० ते १२०० रुपये
- किरकोळ बाजारातील तयार हापूसचे दर (एक डझन) : १००० ते १५०० रुपये
- कच्चा हापूस (४ ते ६ डझन पेटी) : २००० ते ३००० रुपये
- कच्चा हापूस (५ ते ८ डझन) : २५०० ते ४००० रुपये
हंगाम लवकर संपण्याची शक्यता
‘यंदा हापूसचा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतील हापूसचा हंगाम १५ मेपर्यंत, तर देवगडमधील हापूसचा हंगाम एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहील. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देवगडमधील आंब्याची तुरळक आवक होईल. उष्मा वाढल्यानंतर पुढील आठवड्यात हापूसची आवक वाढेल. ही आवक शेवटच्या टप्प्यातील असेल. त्यानंतर दरात घट होईल,’ अशी माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली.
