पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात शेतमाल विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना चहा बिस्किटांवर भूक भागावावी लागत आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे बाजर आवारातील उपाहारगृहे बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. मार्केट यार्डातील श्री शारदा गजानन मंडळाकडून शेतकऱ्यांना विनामूल्य भोजन उपलब्ध करून दिले जाते. बाजार आवारातील अन्य घटकांकडून भोजनासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.
गॅस तुटवड्यामुळे सध्या हा उपक्रम बंद करण्यात आला आहे. बाजार आवरात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकरी उपाहारगृहात जेवण करतात. बाजार आवाराच्या परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्या आहेत. गॅस तुटवड्यामुळे बाजार आवारातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने उपाहारृहचालकाकडून फक्त चहा विक्री केली जात आहे. परगावाहून आलेले शेतकरी चहा आणि बिस्किटे खाऊन भूक भागवत असल्याची माहिती देण्यात आली. खाणावळ, उपाहारगृह चालकांकडून भाज्यांना असणारी मागणी कमी झाली आहे. आखाती देशात पाठविण्यात येणाऱ्या शेतमालाची निर्यात सध्या बंंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बाजार आवारात शेतमाल विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. आवक वाढल्यानंतर शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
‘गॅस तुटवड्यामुळे खाद्यपदार्थ तयार करणे अवघड झाले आहे. बाजार आवारातील शेतकरी, कामगारांसह बाजार आवारातील सर्वांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने प्रशासनाशी संपर्क साधून गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिल्यास उपासमारीची वेळ येणार नाही’, असे मार्केट यार्डातील उपाहारगृह चालक राजेंद्र चोरघे यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवाराचा समावेश अत्यावश्यक सेवेत होतो. शेतकरी परगावाहून शेतमाल घेऊन बाजार आवारात येतात. बाजार आवारातील उपाहारगृह चालकांना प्रशासनाने सिलिंडर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार आहोत.
-प्रकाश जगताप, सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
