पुणे : गणेेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील फूल बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. किरकाेळ बाजारातील विक्रेते, पुष्प सजावटकारांकडून फुलांना मागणी वाढली असून, सर्व प्रकारच्या फुलांचे दर तेजीत आहेत. गुलछडी, शेवंतीच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.
‘गणेशोत्सवात फुलांना चांगले दर मिळत असल्याने शेतकरी चांगल्या प्रतीची फुले राखून ठेवतात. मार्केट यार्डातील फूल बाजारात सोलापूर, वाई, सातारा, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीस पाठविली आहेत. कर्नाटकातून मारिगोल्ड जातीच्या शेवंतीची आवक झाली आहे. पुणे जिल्ह्यातील यवत, लोणी काळभोर भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुलांची लागवड करतात,’ अशी माहिती फूल बाजारातील व्यापारी अखिल फूल बाजार अडते संघटनेचे समन्वयक सागर भोसले यांनी दिली.
ते म्हणाले, ‘उत्सवाच्या काळात फुलांना मागणी राहील. दरही तेजीत असतील. झेंडू, शेवंतीला सर्वाधिक मागणी आहे. सार्वजनिक मंडळांचे मंडप, रथ सजावटीसाठी फुलांचा वापर केला जातो. गुलाब, जास्वंदाला मागणी वाढली आहे. पूजेसाठी जास्वंद, मोगऱ्याला मागणी वाढली आहे.’
चौकट
मुंबई, कोकण, गोव्यातून खरेदी
‘मुंबईतील दादर येथील फूलबाजार, गोवा, कोकणातील फूल विक्रेत्यांनी पुण्यातील फूल बाजारातून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली आहे. गणेशोत्सवात फुलांना चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे,’ असे सागर भोसले यांनी नमूद केले.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत फूल बाजारातील उलाढालीत वाढ झाली आहे. शुक्रवारी (११ सप्टेंबर) फूल बाजारात तब्बल ६८ लाख २६ हजार १४० रुपयांची उलाढाल झाली. उत्सवाच्या काळात उलाढालीत आणखी वाढ होईल. – संतोष कुंभारकर, विभाग प्रमुख, फूल बाजार, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
घाऊक बाजारातील फुलांचे किलोचे दर (रुपयांत)
झेंडू : ३० ते ४०, गुलछडी : ३०० ते ४००, ॲस्टर गड्डी : १० ते २०, सुट्टा : १०० ते १५०, शेवंती : ५० ते १२०, गुलाब गड्डी : २० ते ४०, गुलछडी काडी : ३० ते ८०, डच गुलाब (२० नग) : ६० ते ५०, जर्बेरा : ८० ते १००, कार्नेशिअन : १५० ते २५० रुपये, शेवंती काडी : १५० ते २५०, लिलियम (१० नग) : ८०० ते १५००, ऑर्किड : ४०० ते ६००, जिप्सेफिला : १५० ते २५०, लिली बंडल : १० ते १५, जुई : ७०० ते ८००
