पुणे : गणेशोत्सवानंतर पितृपक्षात फुलांना मागणीअभावी दर न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ‘गणेशोत्सवातील पहिले पाच दिवस फुलांना चांगले दर मिळाले. गौरी विसर्जनानंतर फुलांच्या दरात टप्प्याटप्प्याने घट होत गेली. पितृपक्षात फुलांना मागणी कमी असते.

नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ११ ऑक्टोबर रोजी होणार असून, नवरात्रोत्सवात फुलांच्या मागणीत वाढ होईल, तसेच दरही वाढतील. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुलांची लागवड करतात,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

ते म्हणाले, ‘जुलै महिन्यात पाऊस चांगला झाला. फुलांची लागवडही चांगली झाली. ऑगस्ट महिन्यानंतर पावसाचा जोर ओसरला. पावसात फुले खराब होतात. यंदा श्रावण महिना, गणेशोत्सवात तुरळक पाऊस झाला. पावसाने उघडीप दिल्यानंतर फुलांची प्रतवारीही चांगली राहिली. श्रावण महिना, गणेशोत्सवात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीस पाठविली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत फुलांना अपेक्षित दर मिळाले नाही.’

‘पितृपक्षात फुलांना मागणी कमी आहे. फुलांना कमी दर मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. नवरात्रोत्सवात फुलांना चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची फुले राखून ठेवली आहेत,’ असे व्यापाऱ्यांनी सांगितले. “पितृपक्षात फुलांची आवक कमी होत आहे. फुलांना मागणी कमी आहे. नवरात्रोत्सवात फुलांच्या मागणीत, तसेच दरात वाढ होईल”. – संंतोष कुंभारकर

फूल बाजार विभागप्रमुख, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

फुलांचा प्रकार – सध्याचे किलोचे दर – गणेशोत्सवातील पहिल्या पाच दिवसांतील दर

झेंडू – ५ ते २० रुपये – २० ते ५० रुपये
शेवंती – १० ते ३० रुपये – ५० ते ८० रुपये
गुलछडी – २० ते ४० रुपये – १०० ते १५० रुपये
डच गुलाब (२० नग) – ४० ते ६० रुपये – १०० ते १५० रुपये