पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजरात फुलांची मोठी आवक झाली. झेंडू, मोगरा, गुलछडी, शेवंती या फुलांच्य मागणीत वाढ झाली. मागणीच्या तुलनेत झेंडूची आवक वाढल्याने दरात दहा टक्क्यांनी घट झाली.

‘गुढीपाडव्यानिमित्त मार्केट यार्डातील फूल बाजारात सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातून फुलांची आवक वाढली. गुढीपाडव्याला फुलांना चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी फुले राखून ठेवली होती. कोलकाता गोंडा, केसरी, पिवळ्या रंगाच्या झेंडुची बाजारात मोठी आवक झाली. झेंडूसह शेवंती, बिजली, गुलछडी, अष्टर, मोगरा, कागडा या फुलांना मागणी वाढली.

पुणे शहर, तसेच उपनगरातील किरकोळ फूल विक्रेत्यांनी बुधवारी (१८ मार्च) बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. गुढीपाडव्याला दुकाने, तसेच मंदिराची सजावट केली जाते. सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांच्या मागणीत वाढ झाली होती. फुलांची आवक वाढली होती. मात्र, मागणी चांगली असल्याने दर टिकून होते’, अशी माहिती मार्केट यार्डातील फूल व्यपाारी सागर भोसले यांनी दिली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत गुढीपाडव्याला फुलांची आवक वाढली. एकूण आवक विचारात घेतल्यास फुलांना तशी मागणी कमी राहिली. – संतोष कुंभारकर, फूल बाजार विभाग प्रमुख, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.

मार्केट यार्डातील फुलांचे दर

  • फुलांचे प्रकार – किलोचे दर
  • झेंडू – १० ते ३० रुपये
  • शेवंती – ६० ते १२० रुपये
  • गुलछडी – २०० ते ५०० रुपये
  • मोगरा – ४०० ते ६०० रुपये

मंडई परिसरात खरेदीसाठी गर्दी

गुढीपाडव्यानिमित्त महात्मा फुले मंडई परिसरात गर्दी झाली होती. मंडईतील बूरूड आळी परिसरात गुढी उभारण्यासाठी लागणारी काठी, हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात फुले, दवणा, लिंबाची पाने खरेदीसाठी गर्दी झाली होती. अनेकांनी चक्का, तसेच पेढे खरेदीसाठी मिठाई विक्री दुकानात बुधवारी सायंकाळनंतर गर्दी केली हाेती. मंडई परिसरात मोठी गर्दी झाल्याने सायंकाळी या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.