पुणे : नवीन हंगामातील ज्वारीची आवक सुरू झाली असून, आवक वाढल्याने क्विंटलमागे ३०० रुपयांनी घट झाली आहे. गॅसटंचाईच्या काळात ज्वारी स्वस्त झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
‘हंगामाच्या सुरुवातीला ज्वारीच्या दरात घट झाली असून, यापुढील काळात दर स्थिर राहणार आहेत. मार्च महिन्यापासून ज्वारीचा हंगाम सुरू झाला आहे. ज्वारीची तीन टप्प्यांत लागवड करण्यात येते. त्यानंतर बाजारात ज्वारीची आवक सुरू झाली. हंगामाच्या सुरुवातीला ज्वारीचे दर तेजीत होते. आवक वाढल्यानंतर ज्वारीच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपयांनी घट झाली. ज्वारीचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. यापुढील काळात ज्वारीच्या दरात वाढ होणार नाही. ज्वारीचे दर स्थिर राहतील,’ अशी माहिती मार्केट यार्डातील ज्वारी व्यापारी सचिन रायसोनी यांनी दिली.
‘सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, तसेच जळगाव परिसरात ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. तेथून मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज ८ ते १० ट्रक ज्वारीची आवक होत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीमुळे बाजारात निरुत्साह होता. गॅसटंचाईमुळे खरेदीवर परिणाम झाला होता. आवक वाढल्यानंतर फारशी मागणी नसल्याने ज्वारीच्या दरात घट झाली,’ असे रायसोनी यांनी नमूद केले.
पोषक वातावरणामुळे लागवडीत वाढ
‘शेतकऱ्यांनी तीन टप्प्यांत ज्वारीचे पेरणी केली. पोषक वातावरणामुळे ज्वारीच्या लागवडीत वाढ झाली. मागणीच्या तुलनेत सध्या बाजारात ज्वारीची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून, ज्वारीचे दर येत्या काळात स्थिर राहणार आहेत. यंदा ज्वारीचे दर सामान्यांच्या आवाक्यात राहतील,’ असे ज्वारी व्यापारी सचिन रायसोनी यांनी सांगितले.
घाऊक बाजारातील ज्वारीचे क्विंटलचे दर
| ज्वारी | क्विंटलचे दर |
| गावरान | ४२०० ते ४४०० |
| दुरई (मध्यम) | ३३०० ते ३६०० |
| दुरई (उच्च) | ३६०० ते ३८०० |
