पुणे : कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाचे वेध लागले आहेत. सध्या बाजारात रत्नागिरीहून हापूसची तुरळक आवक होत आहे. सोमवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात विक्रीस पाठविलेल्या एक डझन हापूस आांब्याला सहा हजार रुपये असा भाव मिळाला.

यंदा पोषक वातारवणामुळे कोकणात हापूस आंब्याचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. बाजारात महिनाभरापासून तूरळक प्रमाणात हापूसची आवक सुरू झाली आहे. गणपती पुळे परिसरातील रिळे गावातील बागायदार मकरंद काणे यांच्या बागेतून मार्केट यार्डातील श्री गणेश फ्रुट एजन्सी पेढीवर तीन डझन हापूस आंब्याची पेटी विक्रीस पाठविण्यात आली. चांगल्या प्रतीच्या एक डझन हापूस आंब्याला सहा हजार रुपये असा भाव मिळाला. कोथरूड भागातील व्यापारी फशी बागवान यांनी तीन डझन आंब्याची पेटी खरेदी केली, अशी माहिती आंबा व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे, अडते संघटनेचे माजी उपाध्यक्ष युवराज काची, अडते संघटनेचे संचालक गणेश यादव, राजू भोले, हरिओम ज्यूस सेंटरचे संचालक रामभाऊ मोहिरे, राजू पतंगे, हामजू भोले, कासम बागवान, सीताराम वाडकर, सुनील वंजारी, विठ्ठल माने, राजेश मोहोळ या वेळी उपस्थित होते. यंदा पोषक वातारवणामुळे हापूसची लागवड चांगली झाली.

येत्या पंधरा दिवसात हापूसची तुरळक आवक सुरू होईल. हंगामाच्या पहिल्या टप्यात आवक कमी प्रमाणावर असेल. त्यामुळे हापूसचे भाव जास्त असेल. अनुकूल हवामान राहिल्यास फळधारणा चांगली होईल. आवक वाढल्यानंतर दर आवाक्यात येतील. – अरविंद मोरे, आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड