पुणे : बाजारात लिचीची आवक सुरू झाली असून, वातावरणातील बदलांमुळे बिहारमधील लिची लागवडीत यंदा मोठी घट झाली. हवामान बदलामुळे यंदाच्या हंगामात बिहारमधील जवळपास ८० टक्के लिचीचे नुकसान झाल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.
‘लिचीची सर्वाधिक लागवड पश्चिम बंगाल आणि बिहार या दोन राज्यांत होते. लिचीचा हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला. पावसाळा सुरू झाल्यानंतर लिचीचा हंगाम संपतो. मार्केट यार्डातील फळबाजारात बिहार आणि पश्चिम बंगालमधून तीन हजार ते साडेतीन हजार खोक्यांमधून लिचीची आवक होत आहे. एका खाेक्यात नऊ किलो लिची असते. घाऊक बाजारात ट्रक, तसेच विमानाने लिचीची खोकी विक्रीस पाठविण्यात येतात. ट्रकने बाजारात विक्रीसाठी पाठविलेल्या नऊ किलो लिचीच्या खाेक्याचे दर १४०० ते २६०० रुपये दरम्यान असतात. विमानाने पाठविण्यात आलेल्या खोक्याचे दर २००० ते २६०० रुपयांपर्यंत असतात,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील लिची व्यापारी राजेश परदेशी यांनी दिली.
‘भाडे वाढल्याने विमानाने पाठविण्यात येणाऱ्या लिचीच्या खोक्याच्या दरात ५०० ते ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. लिचीचा हंगाम पुढील १५-२० दिवस सुरू राहील. पश्चिम बंगालमधून लिचीची आवक वाढली आहे. मात्र, यंदा हवामान बदलामुळे बिहारमधील लिचीच्या लागवडीत जवळपास ८० टक्के घट झाली आहे,’ असे त्यांनी सांगितले.
दर वर्षीच्या तुलनेत बिहारमधून १५ ते २० टक्के एवढीच लिचीची आवक होत आहे. आवक घटल्यामुळे लिचीचे दर तेजीत आहेत. पश्चिम बंगालमधील लिचीची आवक मात्र नियमित सुरू आहे.- राजेश परदेशी, लिची व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड
