पुणे : डाळिबांचा हंगाम सुरू झाला असून, मार्केट यार्डातील फळबाजारात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, तसेच बारामती, इंदापूर, पुरंदर तालुक्यातून तब्बल १०० टन डाळिंबांची उच्चांकी आवक झाली. आवक वाढल्याने डाळिंबाच्या दरात घट झाली असून, घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक किलो डाळिंबांना ३० ते ५० रुपये, किरकोळ बाजारात १५० ते २०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
पुण्यातील बाजारपेठेतून देशभरात डाळिंबे विक्रीस पाठविली जातात. बारामती, सांगोला, पंढरपूर, इंदापूर, पुरंदर परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड करतात. डाळिंब उत्पादक पट्ट्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला. दोन वर्षांपूर्वी किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना डाळिंबाच्या बागा काढाव्या लागल्या होत्या. जुन्या बागांची पुन्हा लागवड करण्यात आली. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हंगामात साधारणपणे ५० ते ७० टन डाळिंबाची आवक होत होती. त्या वेळी प्रतवारीनुसार घाऊक बाजारात एक किलो डाळिंबाना १०० ते १२० रुपये किलो दर मिळाले होते, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.
यंदा डाळिंबाचा हंगाम बहरला आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या डाळिंबाची आवक होत आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने लागवडही चांगली आहे. चांगल्या प्रतीच्या डाळिंबाना दर मिळाले आहेत. डाळिंबाची आवक आणखी हाेणार आहे. – युवराज काची, डाळिंब व्यापारी, उपाध्यक्ष, श्री शारदा गजानन अडते संघटना
किडीच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाच्या उत्पादनावर दोन ते तीन वर्षांपूर्वी मोठा परिणाम झाला होता. लाल दाणे, रसाळ, तसेच आकाराने मोठ्या असलेल्या डाळिंबांना चांगली मागणी आहे. – सिद्धार्थ खैरे, डाळिंब व्यापारी, मार्केट यार्ड
