पुणे : खासगी शिकवणीत काम करणाऱ्या शिपायाकडून एका बारा वर्षांच्या विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी शिपायाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शिपायाला अटक केली आहे.

याबाबत पीडित मुलाच्या वडिलांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हा मार्केट यार्डातील शिकवणी वर्गात शिपाई आहे. पीडित मुलगा आठवीत असून, तो शिकवणी वर्गात जायचा. तीन ते चार दिवसांपूर्वी मुलगा शिकवणी वर्गातून घरी आला. रात्री जेवण केल्यानंतर मुलाने शाळेत जाणार नाही, असे वडिलांना सांगितले.

तेव्हा वडिलांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा शिकवणी वर्गातील शिपायाने गेल्या काही महिन्यांपासून अत्याचार केले असून, त्याने मोबाइलमध्ये छायाचित्रे काढली आहेत, असे मुलाने वडिलांना सांगितले. त्यानंतर वडिलांनी शिकवणी वर्गात जाऊन चौकशी केली आणि पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शिपायाला अटक केली.

हातउसने पैशांवरून एकाचा खुनाचा प्रयत्न, तिघे जण अटकेत हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून एकाचा खुनाचा प्रयत्न करुन पसार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली. रेहान उर्फ खिमा फिराेज शेख (वय २०), गौरव गणेश गुजर (वय २०), अतिक हारून अत्तार (वय २१, तिघे रा. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. आरोपींनी एकाकडून हातउसने पैसे घेतले होते. शंकरशेठ रस्त्यावरील धोबीघाट परिसरात ४ एप्रिल रोजी आरोपी आणि तक्रादारामध्ये पैशांवरुन वाद झाला.

त्यानंतर आरोपींनी तक्रादारावर पिस्तूल रोखून त्याला मारहाण केली होती. तक्रारदाराबरोबर असलेल्या भाच्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्यांना मारहाण केली होती. पसार झालेल्या आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून शोध घेण्यात येत होता. पसार झालेल्या आरोपींची माहिती पोलीस कर्मचारी सद्दाम तांबोळी आणि अझीम शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्यांना पकडले.

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, नागनाथ राख, उज्ज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विशाल दळवी, विनोद चव्हाण, संजय सरगर यांनी ही कारवाई केली.