Pune Market Yard Robbery Senior Police Officer Suspended Update: दिवसाढवळ्या ३० लाख रुपयांचा दरोडा पडल्यानंतर त्या प्रकरणाला केवळ बॅग चोरीची क्षुल्लक घटना असल्याची नोंद केल्याप्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिली. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सदर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.

७ ऑक्टोबर रोजी चोरीची घटना घडली होती. मात्र मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात २८ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार, श्रावण देवासी (वय २२) आणि गणपत देवासी (१८) हे मार्केट यार्डमधील एका खासगी कंपनीत काम करतात. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी दोघेही स्कूटरवरून बॅगेत ३० लाख रुपये घेऊन जात होते.

दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी दोन मोटारसायकलवरून आलेल्या पाच लोकांनी त्यांची स्कुटर मार्केट यार्ड जवळील शिवनेरी रोडवर अडवली. यानंतर त्या लोकांनी श्रावण आणि गणपत यांच्या चेहऱ्यावर स्प्रेचा शिडकाव केला आणि त्यांच्या हातातली बॅग घेऊन ते पसार झाले. यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती त्यांचे मालक राकेश परिहारिया यांना दिली आणि त्यानंतर मालकांनी पोलिसांशी संपर्क साधला.

मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली. मात्र पोलिसांनी दरोड्याची नोंद करण्यास नकार दिला. याऐवजी त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी बॅग चोरी झाल्याच्या घटनेची नोंद केली. याच दरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सॅलीसबरी पार्क परिसरातील व्यावसायिकाकडे झालेल्या दरोड्याचा तपास करत असताना दोन जणांना अटक केली. या दोघांची चौकशी केली असता त्यांनी ७ ऑक्टोबर रोजी श्रावण आणि गणपतकडून ३० लाख रुपयांचा दरोडा घातल्याचे कबूल केले.

पण मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फक्त चोरीची तक्रार दाखल झाली होती. यानंतर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची विभागीय चौकशी करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले.

दरोड्याच्या २० दिवसानंतर आता पोलिसांनी श्रावण आणि गणपत यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात पाच लोकांविरोधात एफआयआर दाखल केला.