पुणे : मार्केट यार्डातील गुळ-भुसार बाजराातील व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, तसेच बाजार आवारातील समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि पूना मर्चंटस चेंबरकडून २५ फेब्रुवारी रोजी बंद पुकारला आहे.

‘मार्केट यार्डातील भुसार बाजारातून शेतीमालाची चोरी, वाहतूक समस्या, अस्वच्छतेकडे लक्ष वेधण्यासाटी चेंबरने वेळोवेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदन देण्यात आले होते. बाजार आवारातील समस्या सोडविण्यात न आल्याने व्यापारी बांधवांना व्यवसाय करणे अवघड झाले. या पार्श्वभूमीवर व्यापारी बांधवांच्या विविध समस्या आणि तक्रारींकडे लक्ष वेधण्यासाठी २५ फेब्रुवारी गुळ-भुसार बाजारातील सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दि पूना मर्चंट्स चेंबरकडून याबाबत कार्यकारिणी सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला’, अश माहिती चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.

‘बाजार आवारात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारही करण्यात आली होती. मात्र, कार्यवाही झाली नाही. सुरक्षा ठेकेदारामार्फेत सभासदांना नुकसान भरपाई देण्याबाबत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. वाहतूक कोंडी, अस्वच्छतेमुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे अवघड झाले आहे’, असे बाठिया यांनी नमूद केले.