पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर राहिली. मात्र, मागणी वाढल्याने सातारी आले, घेवडा, काकडीच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. हिमाचल प्रदेशातून मटाराची आवक वाढल्याने दरात १० टक्क्यांनी घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, इंदूरहून ५ ते ६ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटकातून २ टेम्पो घेवडा, गुजरात, कर्नाटकातून प्रत्येकी २ ते ३ टेम्पो भुईमूग शेंग, हिमाचल प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूतून मिळून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून १२ ते १४ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून ४०० ते ५०० गोणी सातारी आले, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ६ ते ७ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, घेवडा ३ टेम्पाे, पावटा २ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा ३ टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, कांदा ८० ते ९० टेम्पो, तसेच, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० टेम्पो अशी आवक झाली.

कोथिंबिर, मेथीच्या दरात घट

उन्हाळ्यामुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. मागणी बेताची असल्याने कोथिंबीर, मेथी या पालेभाज्यांच्या शेकडा जुडीचे दर ५ ते १० टक्क्यांनी कमी झाले. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर राहिले. कोथिंबीर ९० हजार जुडी, तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – १००० ते २०००, मेथी – १५०० ते १८००, शेपू – ८०० ते १५००, कांदापात – ८०० ते १५००, चाकवत – ५०० ते १०००, करडई- ४०० ते ८००, पुदिना – ४०० ते ८००, अंबाडी – ५०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा – ४०० ते ८००, चुका- ५०० ते १०००, चवळई – ५०० ते ८००, पालक -१००० ते १५००

कलिंगड, खरबूज, पेरुच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळांची आवक कमी झाली. कलिंगड, खरबूज, पेरू या फळांच्या दरात वाढ झाली. बाजारात कच्च्या लिंबाची आवक वाढली आहे. लिंबाच्या गोणीमागे १५० रुपयांनी घट झाली. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मोसंबी २० ते २५ टन, संत्री १ ते २ टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई ५ ते ६ टेम्पो, लिंबे १००० ते १५०० गोणी, कलिंगड ८ ते १० टन, खरबूज ७ ते ८ टन, अननस ६ ट्रक, तसेच कोकणातून हापूस आंब्याच्या दीड ते दोन हजार पेट्यांची आवक झाली.