पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजार बटाटा, घेवडा, तोतापुरी कैरीच्या दरात घट झाली. मागणी वाढल्याने काकडी आणि ढोबळी मिरचीच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर राहिले.

गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थानातून ६ ते ७ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटक, तामिळनाडूतून २ ते ३ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा,३ ते ४ टेम्पो पावटा, कर्नाटक, गुजरातमधून प्रत्येकी ३ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो मटार, तसेच मध्य प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून ७०० ते ८०० गोणी सातारी आले, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ६ ते ७ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, कोबी १० ते १२ टेम्पो, पावटा ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, नवीन आणि जुना कांदा मिळून १२५ टेम्पो अशी आवक झाली. तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो अशी आवक झाली.

मेथी, चाकवत, हरभरा गड्डीच्या दरात घट

मार्केट यार्डातील तरकारी विभागात मेथी, चाकवत, अंबाडी, तसेच हरभरा गड्डी या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. कोथिंबीर, शेपू, कांदापात, करडई, पुदिना, मुळे, राजगिरा, चुका, चवळई, पालक या पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. पुणे विभागातून कोथिंबिरीच्या दीड लाख जुडी, मेथीच्या ८० हजार, तसेच ५ ते १० हजार हरभरा गड्डीची आवक झाली. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – ८०० ते १५००, मेथी – ८०० ते १२००, शेपू – ८०० ते १२००, कांदापात – १००० ते १५००, चाकवत – ४०० ते ७००, करडई- ५०० ते ८००, पुदिना – ३०० ते ५००, अंबाडी – ४०० ते ८००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा – ५०० ते ७००, चुका- ५०० ते ८००, चवळई – ४०० ते ७००, पालक – १००० ते १५००, हरभरा गड्डी – ८०० ते १५००.

रमजानमुळे फळांना मागणी

मुस्लीम धर्मियांकडून रमजान महिन्यात उपवास केले जातात. उपवासामुळे फळांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कलिंगड, खरबूची आवक वाढल्याने दरात किलोमागे पाच रुपयांनी घट झाली. मागणी नसल्याने चिकूचे दर कमी झाले. उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांच्या मागणीत वाढ जाली आहे. फळबाजारात मोसंबी ४० ते ५० टन, संत्री २५ ते ३० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई २५ ते ३० टेम्पो, लिंबे ८०० ते १२०० गोणी, कलिंगड ६० ते ७० टेम्पो, खरबूज २५ ते ३० टेम्पो, चिकू तीन हजार गोणी, पेरू १५० ते २०० प्लास्टिक जाळी, अननस ६ ट्रक, स्ट्राॅबेरी ५ ते ६ टन, द्राक्षे ३० ते ३५ टन, बोरे २० पोती अशी आवक झाली.