पुणे : शहर आणि जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळभाज्यांची आवक घटली. पुणे विभागातील शेतकऱ्यांनी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात शेतमाल कमी प्रमाणावर विक्रीस पाठविला. मागणी नसल्याने फळभाज्यांच्या दरात घट झाली.

पुणे शहर आणि जिल्ह्यात दाेन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू झाला. गुरुवारी (२ एप्रिल) दुपारी शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. गुरुवारी दुपारी दोननंतर पाऊस सुरू झाला. बाजार आवारातील कामकाज दुपारी संपले होते. शेतमालाची विक्री झाली होती. त्यामुळे फळभाज्याचे नुकसान झाले नाही. मार्केट यार्डातील वेगवेगळ्या विभागात पाणी साचले होते. रात्री आठनंतर पाणी ओसरले. शुक्रवारी (३ एप्रिल) घाऊक बाजारात फळभाज्यांची नियमित आवक झाली.

‘पावसामुळे पुणे जिल्हा, तसेच सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरातून फळभाज्यांची आवक कमी झाली. नेहमीच्या तुलनेत शुक्रवारी (३ एप्रिल) फळभाज्यांची आवक कमी झाली. नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी फळभाज्या कमी प्रमाणावर विक्रीस पाठविल्या. गॅस टंचाईमुळे शहरातील अनेक उपाहारगृहे, खाणावळी बंद आहेत. उपाहारगृह, तसे खाणावळ चालकांकडून फळभाज्यंना मागणी कमी आहे. मागणीअभावी फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे’, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळभाजी विभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी दिली.

शनिवारी (४ एप्रिल) श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामकाज बंद असते. रविवारी (५ एप्रिल) फळभाज्यांची आवक नियमित होईल, असे कोंडे यांनी सांगितले.