पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली. आखातातील युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे उपाहारगृह चालक, तसेच खाणावळ चालकांकडून फळभाज्यांच्या मागणीत घट झाली आहे. मागणी अभावी सर्व प्रकारच्या फळभाज्यांच्या दरात घट झाली आहे.
गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली. कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थानातून २ ते ४ टेम्पो गाजर, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटक, तामिळनाडूतून १ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो घेवडा, २ टेम्पो पावटा, कर्नाटक, गुजरातमधून प्रत्येकी २ टेम्पो भुईमूग शेंग, राजस्थान, मध्य प्रदेशातून मिळून २ ते ३ टेम्पो मटार, तसेच मध्य प्रदेशातून ८ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून २६० गोणी सातारी आले, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, पावटा २ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, कांदा १२० टेम्पो अशी आवक झाली. तसेच, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा २५ ते ३० टेम्पो अशी आवक झाली.
कोथिंबिर, मेथी, चाकवत, हरभरा गड्डीच्या दरात घट
मार्केट यार्डातील तरकारी विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली. सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात घट झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. कोथिंबिर, मेथी, चाकवत, हरभरा गड्डी, पुदिना, चुका या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. शेपू, कांदापात, करडई, मुळे, राजगिरा या पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – ८०० ते १२००, मेथी – ८०० ते १५००, शेपू – ८०० ते १२००, कांदापात – ८०० ते १५००, चाकवत – ४०० ते ७००, करडई- ५०० ते ८००, पुदिना – ३०० ते ५००, अंबाडी – ५०० ते ८००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा – ४०० ते ७००, चुका- ५०० ते ८००, चवळई – ५०० ते ८००, पालक – १००० ते १५००, हरभरा गड्डी – ८०० ते १०००.
लिंबाच्या दरात घट
रमजान महिन्यात फळांना मागणी आहे. मात्र, उपाहारगृह चालकांकडून असणारी मागणी कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत फळांची आवक वाढलीआहे. लिंबाच्या दरात घट झाली आहे. कलिंगड, खरबूज, पपई, चिकू, डाळिंब, संत्री, मोसंबी, पेरुचे दर स्थिर आहेत. मोसंबी २५ ते ३० टन, संत्री १५ ते २० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे ८०० ते १००० गोणी, कलिंगड ९० ते १०० टन, खरबूज ७० टन ते ८० टन, चिकू दोन हजार गोणी, पेरू १५० ते २०० प्लास्टिक जाळी, अननस ६ ट्रक अशी आवक झाली.
