Pune Market Yard Rates: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे फळभाज्यांच्या तोडणीवर परिणाम झाल्याने पुणे विभागातून मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाले. आवक कमी झाल्याने टोमॅटो, काकडीच्या दरात वाढ झाली. तोतापुरी कैरीच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे स्थिर राहिले

गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थानातून ७ ते ८ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटक, तामिळनाडूतून ३ ते ४ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटकातून २ टेम्पो पावटा, कर्नाटक, गुजरातमधून प्रत्येकी २ ते ३ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेश, राजस्थानातून मिळून १५ ते १६ टेम्पो मटार, तसेच मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून ४०० ते ४५० गोणी सातारी आले, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार २ ते ३ टेम्पो, टोमॅटो ६ ते ७ हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, पावटा २ ते ३ टेम्पो, ढोबळी मिरची ४ ते ५ टेम्पो, तांबडा भोपळा २टेम्पो, गाजर २ ते ३ टेम्पो, नवीन आणि जुना कांदा मिळून ७० ते ८० टेम्पो अशी आवक झाली. तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो अशी आवक झाली.

कोथिंबिर, मेथी, कांदापातीच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिर, मेथी, शेपू, कांदापात, चवळई या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. चाकवत, पुदीना, हरभरा गड्डीच्या दरात घट झाली. करडई, अंबाडी, मुळे, राजगिरा, चुका, पालकचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. पुणे विभागातून कोथिंबिरीच्या ९० हजार मेथीच्या ६० हजार, तसेच ७ ते ८ हजार हरभरा गड्डीची आवक झाली. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – १००० ते २०००, मेथी – १००० ते १५००, शेपू – ८०० ते १०००, कांदापात – १००० ते १५००, चाकवत – ४०० ते ७००, करडई- ३०० ते ७००, पुदिना – ३०० ते ५००, अंबाडी – ५०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा – ४०० ते ७००, चुका- ५०० ते ८००, चवळई – ४०० ते ७००, पालक – ८०० ते १५००, हरभरा गड्डी – ७०० ते १०००.

कलिंगड, खरबूज, पपई, लिंबू महाग

घाऊक बाजारात कलिंगड, खरबूज, लिंबे, पपईच्या दरात वाढ झाली. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील फळ बाजारात मोसंबी ४० ते ५० टन, संत्री ३० ते ४० टन, डाळिंब २० ते २२ टन, पपई ८ ते १०टेम्पो, लिंबे एक हजार ते १४०० गोणी, चिकू २ हजार गोणी, खरबूज २० ते २५ टेम्पो, कलिंगड १५ ते २० टेम्पो, पेरु १५० ते २०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), केरळहून अननस ६ ट्रक, बोरे १०० गोणी अशी आवक झाली.