पुणे : पितृपक्षात भाज्यांच्या मागणीत वाढ झाली असून, श्राद्धासाठी लागणाऱ्या भाज्यांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गवार, भेंडी, चवळई शेंग, कारली, काकडी, घोसावळे या भाज्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.

‘पितृपक्षात नैवेद्यासाठी गवार, भेंडी, चवळई शेंग, कारली, काकडी, घोसावळे या भाज्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली’, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ आणि श्री शारदा गजानन अडते संघटनेचे अध्यक्ष अमोल घुले-पाटील यांनी दिली.

‘नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. १० ऑक्टोबरपर्यंत भाज्यांना मागणी राहणार आहे. नवरात्रोत्सवात अनेक जण उपवास करतात. नवरात्रोत्सवात भाज्यांच्या मागणीत घट होईल’, असे त्यांनी नमूद केले. ‘पितृपक्षात किरकोळ बाजारात एक किलो भाजीची विक्री ८० ते १०० रुपये दराने केली जात आहे. भाज्यांना मागणी वाढल्याने दर तेजीत आहेत’, असे किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

पितृपक्षात भाज्यांचे दर तेजीत असतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाज्यांचे दर तुलनेने कमी आहेत. अनेक जण नोकरी व्यवसायानिमित्त धावपळीत असतात. त्यामुळे त्यांना तेवढा वेळ मिळत नाही. केटरिंग व्यावसायिकांकडे नोंदणी करून स्वयंपाक तयार करून घेतला जातो. – प्रकाश ढमढेरे, भाजीपाला व्यापारी, किरकोळ बाजार

भाज्यांचे किलो भाव

 घाऊक बाजार किरकोळ बाजार

गवार ४० ते ६० १०० ते १२०
भेंडी २५ ते ४० १०० ते १२०

चवळई शेंग २० ते २५ ८० ते १००

कारली २५ ते ३० ८० ते १००

काकडी १५ ते २० ६० ते ८०

घोसावळे २५ ते ३० ८० ते १००