पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली. उन्हाळ्यामुळे फळभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. घेवड्याच्या दरात घट झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर राहिले.गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तसेच आंध्र प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, इंदूरहून ४ ते ५ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, गुजरात, कर्नाटकातून प्रत्येकी १ टेम्पो भुईमूग शेंग, हिमाचल प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूतून मिळून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील अडते निखील भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून ४५० ते ५०० गोणी सातारी आले, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ८ हजार पेटी, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, काकडी ७ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, गाजर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, पावटा २ ते ३ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, घेवडा २ ते ३ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, भुईमूग शेंग १५० गोणी, कांदा १०० टेम्पो, तसेच, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० टेम्पो अशी आवक झाली.

कोथिंबीर, अंबाडी, राजगिरा स्वस्त

गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरेची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात कोथिंबिरेच्या जुडीमागे पाच रुपयांनी घटना झली. अंबाडी, राजगिरा या पालेभाज्यांच्या जुडीच्या दरात दोन रुपयांनी घट झाली. मागणीच्या तुलनेत शेपू आणि कांदापातीची आवक कमी प्रमाणावर होत आहे. कांदापात आणि शेपुच्या दरात वाढ झाली. तरकारी विभागात कोथिंबीर दीड ते दोन लाख जुडी, तसेच मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – १५०० ते २५००, मेथी – १००० ते २५००, शेपू – १००० ते १५००, कांदापात – १००० ते १८००, चाकवत – ५०० ते १०००, करडई- ५०० ते १०००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ८००, मुळे – १००० ते १५००, राजगिरा – ५०० ते ८००, चुका- ५०० ते १०००, चवळई – ५०० ते १०००, पालक -१५०० ते २०००

खरबूज, पपई, मोसंबीच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळांची आवक कमी झाली. खरबूज, पपई, मोसंबीच्या दरात वाढ झाली. कलिंगडाच्या दरात घट झाली. चिकू, अननस, डाळिंब, लिंबू, पेरू, संत्री या फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मोसंबी १२ ते १४ टन, संत्री १ टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई १० ते १२ टेम्पो, लिंबे १२०० ते १५०० गोणी, कलिंगड १२ ते १५ टेम्पो, खरबूज १० ते १२ टेम्पो, अननस ५ ट्रक, पेरु २०० ते २५० प्लास्टिक जाळी (क्रेट्स) अशी आवक फळबाजारात झाली.