पुणे : उन्हाचा चटका वाढल्यानंतर कलिंगडाच्या मागणीत वाढ झाली आहे. मुस्लीम धर्मियांकडून रमजान महिन्यात उपवास केले जातात. रमजानमुळे कलिंगडाच्या मागणीत वाढ झाली आहे. पुण्यातील मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारत कलिंगडाची १५० ते २०० टन अशी उच्चांकी आवक झाली. आवक वाढल्यानंतर कलिंगडााच्या दरात घट झाली आहे.
‘रमजान महिन्यात कलिंगडाच्या मागणीत मोठी वाढ होते. रमजान महिना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला कलिंगडाला चांगले दर मिळाले. कलिंगडाच्या मागणीत वाढ झाल्यानंतर आवकही वाढली. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात सध्या कलिंगडाची उच्चांकी आवक होत आहे. बाजारात पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कलिंगडे विक्रीस पाठविली आहे. बाजारात साधारणपणे १५० ते २०० टन कलिंगडाची आवक होत आहे’, अशी माहिती मार्केट यार्डातील कलिंगड व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी दिली.
‘कलिंगडाचा हंगाम जानेवारी महिन्यात सुरू होतो. हंगामाच्या पहिल्या टप्यात कलिंगडाला मागणी तशी कमी असते. उन्हाचा चटका वाढल्यानंतर मागणीत वाढ होते. सध्या कलिंगडाचा हंगाम बहारात आला आहे. बाजारात उच्चांकी आवक होत आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात कलिंगडाला सर्वाधिक मागणी असते. जून महिन्यात कलिंगडाचा हंगाम संपतो. सध्या घाऊक बाजारात एक किलो कलिंगडला प्रतवारीनुसार ८ ते १५ रुपये दर मिळाले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो कलिंगडाचे दर प्रतवारीनुसार २० ते ३५ रुपयांपर्यंत आहेत. रमजान महिन्याची सांगता २१ मार्च रोजी होणार आहे. रमजान महिन्यातील शेवटच्या टप्यात कलिंगडाच्या मागणीत घट होते, असा अनुभव आहे. त्यानंतर पुन्हा कलिंगडांना मागणी वाढते. बाजारात शुगरक्वीन, सिंबा, मॅक्स, सोनिया प्लस, मेलडी किंग, शरयू, मन्नत या जातीची कलिंगडे उपलब्ध आहेत’, असे त्यांनी नमूद केले.
परीक्षा संपल्यानंतर मागणीत वाढ
‘उन्हाळ्यात कलिंगडाच्या मागणीत मोठी वाढ होते. फळ विक्रेते, सरबत विक्रेत्यांकडून कलिंगडाच्या मागणीत वाढ झाली आहे. मार्केट यार्डातील बाजारातून पुणे शहर, उपनगर, पिंपरी-चिंचवड, लोणावळा, खंडाळा परिसरात कलिंगडे विक्रीस पाठविली जात आहे. सध्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षा संपल्यानंतर कलिंगडाच्या मागणीत मोठी वाढ होईल’, असे कलिंगड व्यापारी पांडुरंग सुपेकर, माऊली आंबेकर यांनी सांगितले.
