पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळभाजी, कांदा-बटाटा विभागात मंगळवारपासून (१० मार्च) ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतीमालाची चढ-उतार न करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.
‘आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, केंद्र शासन, राज्य शासन, कामगार आयुक्त कार्यालय, तसेच बाजार समितीने यापूर्वी परिपत्रकाद्वारे पोते, गोणीत ५० किलोंपेक्षा जास्त शेतीमाल भरण्यात येऊ नये, असा नियम लागून केला होता. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून संबंधित निर्णय कागदावरच होता. त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर रविवारी (८ मार्च) मार्केट यार्डातील कामगार, वारणार, भरणार, तोलणार, तसेच महिला कामगारांची बैठक झाली.
श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियचे अध्यक्ष संतोष नांगरे, सचिव विशाल केकाणे, संजय साष्टे, भरत शेळके, अमर रणदिवे, आबू जाधव, शशिकांत शिंदे, गणेश शिर्के, महेंद्र केकाणे, संतोषी शिवशरण, संतोष ताकवले, शाम शितोळे, संतोष भाडले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘ या बैठकीत ५० किलोपेक्षा जास्त वजन न उचलण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. ६५ ते ७५ किलोपर्यंतच्या वजनाच्या पोत्यांमुळे कामगारांना मणके आणि गुडघेदुखीचा त्रास होत आहेत. तंगूस (प्लास्टिक सदृश) बारदानामुळे लोखंडी हूक सुटून दुखापती होत आहेत.
त्यामुळे लावणार, वारणार, गाळा कामगार गाळ्यांवर काम करण्यास तयार नाहीत. अनेक जण राजीनामे देत आहेत. नवीन कामगारही अशा प्रकारचे काम करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे ५० किलोंपेक्षा अधिक वजनाचा शेतीमालाची चढउतार न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमाप्रमाणे ५० किलो वजन न आल्यास बाजाराचे कामकाज बंद ठेवण्यात येईल’, असा इशारा संतोष नांगरे यांनी दिला. ’कामगारच टिकले नाहीत, तर काम करणेच अवघड होईल. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे विशाल केकाणे यांनी नमूद केले.
