पुणे : माहेरहून पाच लाख रुपये, तसेच हुंड्यात सोन्याचे दागिने आणावेत म्हणून सासरकडील नातेवाइकांनी छळ केल्याने महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नगर रस्त्यावरील केसनंद भागात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सासू, दीर, तसेच मामेसासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वाती सूरज पाठक (वय २०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती सूरज राजेंद्रप्रसाद पाठक (वय २६, रा. ओम निवास, तळेरानवाडी रस्ता, केसनंद, नगर रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सासू सुनीता पाठक (वय ४५), दीर नीरज पाठक (वय २३), मामे सासरे अरुण उपाध्याय, अरविंद उपाध्याय (सर्व रा. केसनंद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वातीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती मूळची मध्य प्रदेशातील महू शहरातील आहेत. तिचा गेल्या वर्षी मार्च महिन्यात सूरज पाठक याच्याशी विवाह झाला होता. विवाहात स्वातीच्या कुटुंंबीयांनी एक लाख रुपये हुंडा आणि सात तोळे सोन्याचे दागिने दिले होते. विवाहानंतर काही महिन्यांत पती सूरज, सासू सुनीता, दीर नीरज, मामेसासरे उपाध्याय यांनी हुंड्यात पैसे, तसेच दागिने कमी दिल्याचे सांगून तिचा छळ सुरू केला. तिला टोमणे मारण्यात आले. आरोपींनी माहेरहून पाच लाख रुपये हुंडा आणि सोन्याचे दागिने घेऊन येण्याची मागणी केली. छळामुळे स्वातीने ६ जून रोजी राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हुंड्यासाठी मुलीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद स्वातीच्या आईने नुकतीच दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अहिरे तपास करत आहेत.