पिंपरी : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. सुजाता नरसिंग माने (वय ३२, रा. तनिष पर्ल, चऱ्होली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना ३ जून रोजी दुपारी चऱ्होली येथे घडली. याप्रकरणी सुजाता यांचे वडील शिवाजी संपतराव सूर्यवंशी (वय ५६, रा. थेरगाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता आणि नरसिंग यांचा २५ जून २०१९ रोजी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर नरसिंग याने दिसायला चांगल्या नाहीत, असे म्हणून सुजाताचा मानसिक छळ केला. तसेच माहेराहून पैसे आणण्यासाठी दबाव आणला. सदनिकेसाठी तसेच आर्थिक अडचणी असल्याचे सांगून सुजाता यांचे दागिने गहाण ठेवले. या छळाला कंटाळून सुजाता हिने ३ जून रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अंभोरे तपास करीत आहेत.