पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एकाने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. महिलेने पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने तिला सिंहगड रस्ता भागात बोलावले. पैसे परत करण्याचा बहाणा करुन पिशवीत लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा भरून दिल्या. नोटांची पिशवी महिलेला देऊन आरोपीला पसार झाला. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, गोरखनाथ गावंडकर (रा. कडसुरे, जि. रायगड) याच्याविरुद्ध अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३२ वर्षीय महिला सिंहगड रस्ता भागातील नांदेड सिटी परिसरात राहायला आहे. गेल्या वर्षी महिलेने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. आरोपीने विवाहविषयक संकेतस्थळावरुन महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने विवाहाचे आमिष दाखवून महिलेला जाळ्यात ओढले. आर्थिक अडचणीत असल्याची बतावणी करुन महिलेकडून वेळोवेळी २१ लाख रुपये घेतले. महिलेने पैसे करण्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने पैसे परत करतो, असे सांगून महिलेला सिंहगड रस्ता परिसरात भेटायला बोलाविले.
आरोपी आणि महिला एका हॉटेलमध्ये भेटले. तेथे त्याने महिलेला लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा एका पिशवीत भरून दिला. महिलेने पिशवी उघडून पाहिली नाही. आरोपी तेथून पसार झाला. काही वेळानंतर महिलेने पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीत खेळण्यातील नोटा भरून दिल्याचे उघडकीस आले. महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाणटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, सहायक निरीक्षक कदम तपास करत आहेत.
एटीएममधून पैसे काढणाऱ्या मुलाची एक लाखांची फसवणूक
एटीएममधून पैसे काढणाऱ्या मुलाला मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्याने खात्यातून एक लाख रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली. खडकीतील ओैध रस्ता परिसरातील एका बँकेच्या एटीएमजवळ रविवारी ही घटना घडली. पसार झालेल्या चोरट्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४७ वर्षीय महिला ओैंध रस्ता परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांच्या वडिलांचे रविवारी निधन झाले. त्यानंतर महिलेने मुलाला त्यांच्याकडील एटीएम कार्ड दिले. ‘अंत्यविधीसाठी पैसे लागतील. एटीएममधून पैसे काढून ये’, असे त्यांनी मुलाला सांगितले. त्यानंतर मुलगा सकाळी साडेनऊच्या सुमारास ओैंध रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएम परिसरात गेला. एटीएमच्या परिसरात चोरटा थांबला होता. मुलगा एटीएममध्ये गेल्यानंतर चोरटा आत शिरला.
एटीएममधून पैसे काढणाऱ्या मुलाकडे मदतीचा बहाणा केला. मुलाकडील एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द (पासवर्ड) चोरट्याने घेतला. चोरट्याने एटीएममधून पैसे काढण्याचा बहाणा केला. पैसे निघत नसल्याची बतावणी मुलाकडे केली. चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्ड मुलाला दिले. चोरटा एटीएममधून बाहेर पडला. काही वेळानंतर मुलाच्या आईच्या बँक खात्यातून चोरट्याने टप्याटप्याने एक लाख रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत असून, एटीएम परिससरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे. पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.
