पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एका तरुणीची २८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी फसवणूक, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एका तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी उच्चशिक्षित आहे. तिने विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपीने तरुणीशी संपर्क साधला. विवाहासाठी उत्सुक असल्याचे त्याने तरुणीला सांगितले; तसेच तुर्कीयेतील एका कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी त्याने केली. त्यानंतर आरोपीने तरुणीशी नियमित संपर्क साधण्यास सुरुवात केली. विवाहाच्या आमिषाने तरुणीला जाळ्यात ओढले.

काही दिवसांनंतर तुर्कीयेतील बँक खाते काही कारणास्तव गोठविण्यात आले आहे, असे सांगितले. तातडीने पैशांची आवश्यकता आहे, असे सांगून आरोपीने तरुणीला पैसे पाठविण्यास सांगितले. तरुणीने आरोपीच्या बँक खात्यात गेल्या पाच ते सहा महिन्यांत वेळोवेळी २७ लाख ९४ हजार रुपये पाठविले. पैसे पाठविल्यानंतर आरोपीने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक रेवले तपास करत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची १८ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक कोथरूड भागात राहतात. ते सेवानिवृत्त आहेत. जून महिन्यात त्यांनी समाज माध्यमात शेअर बाजारातील गुंतवणूकविषयक जाहिरात पाहिली होती. जाहिरातीत शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने सायबर चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्याने तक्रारदाराला पैसे गुंतविण्यास सांगितले. तक्रारदाराने १८ लाख ६० हजार रुपये गुंतविले. गुंतवणूक केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही; तसेच गुंतवणूक केलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.