पुणे : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने विसर्जन मिरणुकीची सुरुवात महापौरांना करता येणार नाही. गेली चार वर्षे प्रशासक राज होते. यंदा निवडणुका होऊन लोकप्रतिनिधींची निवड झाली असली, तरी आचारसंहितेमुळे महापौरांना मिरवणुकीचा प्रारंभ, तसेच मंडळांचे स्वागत करता येणार नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी महापालिकेचे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर देखील महापौरांना मानापासून वंचित रहावे लागणार आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात करण्याचा मान शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना असतो. वर्षानुवर्षे महापौर पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांचा हा मान मिळत आला आहे. महापौर, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणूक सुरू होते. गेल्या चार वर्षांपासून महापालिकेची निवडणूक रखडल्याने संपूर्ण कारभार महापालिका आयुक्तांच्या हाती होता. राज्य सरकारने आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नियुक्त केले होते. त्यामुळे चार वर्षे हा मान प्रशासनाला, म्हणजेच आयुक्तांना मिळाला.

पुणे शहराच्या विसर्जन मिरवणुकीची दैदिप्यमान परंपरा आहे. पुण्याची मिरवणूक पाहण्यासाठी विविध राज्यातील नागरिकांबरोबरच परदेशातील भाविक दरवर्षी येतात. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या चार वर्षांपासून रखडल्या होत्या. त्यामुळे लोकप्रतिनिधी नव्हते. महापालिका आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातूनच संपूर्ण महापालिकेचा कारभार चालवल्या जात होता.

महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका पूर्ण होऊन आठ महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात लोकप्रतिनिधींच्या हाती कारभार गेला. महापौर, उपमहापौरांसह विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष तसेच विविध समित्यांच्या प्रमुखांची नियुक्ती झाली. चार वर्षांनंतर यंदा पुन्हा एकदा विसर्जन मिरणुकीचा मान महापौरांना मिळणार होता. मात्र, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने यंदाही महापौरांचा मान हिरावला गेला आहे. यंदाही महापालिका आयुक्तांच्या हस्तेच मानाच्या गणपतींची आरती करून मिरवणुकीला सुरुवात होईल.

स्वागत कक्षातही अधिकारी

विसर्जन मिरणुकीच्या मार्गावर महापालिकेच्या वतीने टिळक चौकात मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांच्या स्वागतासाठी कक्ष उभारला जातो. दरवर्षी येथे महापौरांसह इतर लोकप्रतिनिधी, आयुक्त उपस्थित राहून गणेश मंडळांचे स्वागत करतात. त्यांना श्रीफळ देऊन सन्मानित करतात. मात्र, यंदा आचारसंहितेमुळे महापौरांसह लोकप्रतिनिधींना महापालिकेच्या स्वागत कक्षात बसता येणार नाही. या कक्षात महापालिकेतील अधिकारीच बसलेले दिसणार आहेत. गेल्या चार वर्षांपासून महापालिकेच्या या स्वागत कक्षात अधिकारीच उपस्थित राहून गणेश मंडळांचे स्वागत करतात. यंदाच्या वर्षी यामध्ये बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.