पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष डॉ. विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावरून आता राजकीय वाद पेटला आहे. आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या भूमिकेच्या विरोधात पुणे बंदचा इशारा दिला. त्यानंतर शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी ‘आमदार रोहित पवार यांनी पुणे शहर बंद करून दाखवावेच,’ असे आव्हान दिले.
‘पुणेकरांना आंदोलनाच्या माध्यमातून वेठीस धरण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,’. पुणेकर शांत बसणार नाहीत. आंदोलन करण्याच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना ते धडा शिकवतील, असेही नागपुरे यांनी सुनावले. यावेळी पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर उपस्थित होते.
‘एमपीएससी’च्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरुन आमदार रोहीत पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात गेल्या काही दिवसांपासून ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास पुणे बंद करू, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला. त्यानंतर महापौर नागपुरे यांनी पुणे महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन पुणे बंदचा इशारा देणाऱ्या आमदार रोहित पवार यांना कडक शब्दांत सुनावले.
महापौर नागपुरे म्हणाल्या, ‘पुणेकरांचा बाणा वेगळा आहे. ‘एमपीएससी’च्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करून शहराचे जनजीवन ठप्प करण्याचा प्रयत्न केला, तर पुणेकर ते सहन करणार नाहीत. आम्ही शहर अजिबात बंद पडू देणार नाही.
एमपीएससी च्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. या विद्यार्थ्यांना अडीच ते तीन तास वेळ देऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. काही मागण्यांवर निर्णयदेखील घेतले आहेत. त्यामुळे हे आंदोलन करण्यामागे नेमका हेतू काय? विद्यार्थ्यांनी राजकीय नेत्यांच्या मागे लागून आपले करिअर धोक्यात घालू नये.’
पुणेकरांपेक्षा कोणी मोठे नाही. पुणे बंद करण्याची धमकी देऊ नये. पुणेकरांचा संयम तोडू नये, अशा शब्दात सभागृह नेते गणेश बीडकर यांनी रोहित पवार यांना सुनावले. पवार यांनी पुणेकरांना वेठीस धरत शहर बंद करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असेही बीडकर म्हणाले.
शिवसेना (शिंदे) पक्ष आक्रमक
‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांच्या मागण्या न्याय असून त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. मात्र, आमदार रोहित पवार यांनी ‘पुणे बंद’चा दिलेला इशारा चुकीचा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नानिमित्त संपूर्ण पुणे शहर बंद करून सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरू नका,’ असे आवाहन शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या पुणे बंदच्या हाकेवर भानगिरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘रोहित पवार यांनी पुणे बंदची केलेली घोषणा ही राजकीय भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संपूर्ण पुणे शहर बंद करून सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे,’ असा प्रश्न भानगिरे यांनी विचारला.
