पुणे : महानगरपालिकेच्या आरोग्य कोटीवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याच्या मुलीच्या मदतीला शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर मंजुषा नागपुरे धावून आल्या. महापौरांनी घेतलेल्या पुढाकारामुळे या सफाई कर्मचाऱ्यांच्या साडेतीन वर्ष मुलीवर आवश्यक असलेले उपचार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौर नागपुरे यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे या चिमुकलीवर कानाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील गोसावी आरोग्य कोटी येथे नितीन कमलापुरे हे सेवक म्हणून कार्यरत आहेत. ते कंत्राटी पद्धतीने महापालिकेच्या सेवेत काम करत आहे. सफाई सेवक असलेल्या कमलापुरे यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलीला कानाचा गंभीर आजार झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. ही शस्त्रक्रिया वयाच्या चार वर्षाच्या आत करणे आवश्यक आहे. नाहीतर संबंधित चिमुकलेला कायमचा मूकबधिरपणा येऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले होते.

साडेतीन वर्षाच्या या चिमुकलीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी सुमारे ३७ लाख रुपयांचा खर्च सांगितला आहे. महापालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सेवकांना संबंधित ठेकेदाराकडून ‘ कर्मचारी राज्य विमा’ हे कार्ड दिले जाते. मात्र ज्या ठेकेदाराकडे कमलापुरे काम करत होते त्यांनी कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) योजनेचे कार्ड दिले नव्हते. तसेच संबंधित ठेकेदाराने ईएसआयकडे जी रक्कम भरायची होती. ती देखील भरली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे या चिमुकलीवर केल्या जाणाऱ्या उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते.

साडेतीन वर्षाच्या या मुलीवर वेळेत उपचार न झाल्यास तिला कायमस्वरूपी मूकबधिरपणा येऊ शकतो, त्यामुळे तातडीने या चिमुकलीवर उपचार करून शस्त्रक्रिया करून घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी तिच्या पालकांना दिला होता. ठेकेदाराने ईएसआय कडे पैसे न भरल्याने उपचार करून देण्यास रुग्णालयांकडून नकार दिला जात होता. ही बाब कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या निदर्शनास आल्यानंतर संघटनेने याबाबत पाठपुरावा सुरू केला.

ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे राज्य विमा मंडळाकडे पैसे न भरण्याने संबंधित पालक त्रस्त झाले असून यामध्ये मदत करावी, असे साकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि या चिमुकलीच्या वडिलांनी महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेत त्यांच्याकडे घातले. कामगार हितरक्षक संघाच्या वतीने महापौर नागपुरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर मंजुषा नागपुरे यांनी तातडीने पावले उचलत या प्रकरणांमध्ये मध्यस्थी करत महापालिकेच्या संबंधित विभागाला तसेच इएसआय च्या अधिकाऱ्यांशी या प्रकरणाबाबत चर्चा करत आवश्यक त्या सूचना दिल्या.

महापौरा मंजुषा नागपुरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे संबंधित कामगाराला ईएसआय कार्ड मिळाले आहे. हे कार्ड मिळाल्याने संबंधित कामगाराच्या चिमुकलीवर उपचार आणि शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौर नागपुरे यांनी केलेल्या सूचनेनंतर तातडीने सूत्रे हलविण्यात आली. या कामगाराला त्याचे रखडलेले ईएसआय कार्ड देण्यात आले आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने अत्यंत कमी वेळेत संबंधित कामगाराला त्याचे कार्ड मिळाले आहे. याबाबत कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शरद भाकरे व सचिव मनीषभाई शेठ यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांचे विशेष आभार मानले आहेत.

ईएसआय योजना म्हणजे काय ?

कामगार राज्य विमा (ईएसआय) ही विमा योजना आहे. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कामगार राज्य विमा कडून मिळणारी मोफत, दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधा आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा पगार २१ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. अशा कर्मचाऱ्यांना आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना सरकारी दवाखान्यात किंवा रुग्णालयात बाह्यरुग्ण (ओपीडी) आणि आंतररुग्ण (आयपीडी) उपचार, औषधे, शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळतात