पुणे : ‘पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी शहरातील नालेसफाईची कामे एप्रिल महिन्याअखेरपर्यंत पूर्ण करावी आणि त्याचा दैनंदिन अहवाल महापौर कार्यालयाला द्यावा,’ असा आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले आहेत. नालेसफाईच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षांतील अतिवृष्टीचा अनुभव घेता शहरातील काही भागांत आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पुराचा धोका अधिक असतो. प्रशासनाने अशा ‘पूरप्रवण’ ठिकाणांची यादी अद्ययावत करून तिथे पाणी साचू नये म्हणून आतापासूनच ‘पंपिंग स्टेशन्’ आणि आवश्यक उपाययोजना सज्ज ठेवाव्यात, असे या आदेशात नागपुरे यांनी नमूद केले असून, येत्या काही दिवसांमध्ये पूरपरिस्थिती उद्धवणाऱ्या भागांची पाहणी त्या करणार आहेत.
‘नदीसुधार प्रकल्पाच्या सध्याच्या प्रगतीचा आणि पावसाळ्यातील सुरक्षेचा सविस्तर अहवाल महापौर कार्यालयाला सादर करावा. पावसाळ्यात रस्ते निसरडे होऊन अपघात टाळण्यासाठी नवीन खोदकामास परवानगी देण्याची तारीख निश्चित करावी. शहरात सुरू असलेली कामे तत्काळ पूर्ण करून रस्ते पूर्वस्थितीत आणावेत,’ अशी सूचनाही नागपुरे यांनी केल्या असून, या संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.
रस्ते खोदकामावर नियंत्रण
‘पावसाळ्यात निसरडे रस्ते आणि अपघात टाळण्यासाठी नवीन खोदकामास परवानगी देण्याची अंतिम तारीख निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करून रस्ते पूर्ववत करावेत,’ असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
उपमहापौरांकडून प्रभागाची पाहणी
उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी औंध–बोपोडी प्रभागात सकाळी सहा वाजता नागरिकांच्या विविध समस्या आणि नागरी सुविधांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात उपमहापौरांनी बोपोडी आरोग्य कोठी, नाईक चाळ, भीमज्योत नगर, सर्व्हे नं. २६, पठाण चाळ, रेल्वे गेट, गांधी नगर, भोईटे चाळ तसेच मुंबई–पुणे रोडवरील गेट क्रमांक २० या भागांना भेटी दिल्या. ड्रेनेज लाईन, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये, रस्त्यांची दुरवस्था, पथदिवे या संदर्भातील नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन सर्व समस्यांवर तातडीने व प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
