पुणे : ‘कात्रज-कोंढवा रस्त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी प्रशासनाला धारेवर धरून जाब विचारल्यानंतर त्यावर खुलासा करताना चार मद्द्यांचा संदर्भ देऊन प्रशासनाने खुलासा करावा,’ असे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले. मात्र, सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना पाऊण तासाच्या खुलाशात महापौरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर एक चकार शब्दही न काढून सर्वसाधारण सभेतच महापौरांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र निर्माण झाले.
पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी महापालिकेच्या नवीन इमारतीमधील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. महापौर नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभेला सुरुवात होताच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या सदस्यांनी कात्रज कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये १६ वर्षीय तरुणीचा जीव गेल्याचा मुद्दा उपस्थित केला.
या रस्त्याबाबत सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी खुलासा केला. पावसकर प्रशासनाचा खुलासा करण्यासाठी आल्यानंतर महापौर नागपुरे यांनी या विषयामध्ये चार मुद्द्यांवर खुलासा करण्याचे आदेश दिले. यामध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या नवीन गावांमध्ये रस्ते, पदपथ तसेच इतर आवश्यक सोयीसुविधा करण्यासाठी किती निधी आवश्यक आहे, महापालिकेच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात यासाठी किती निधीची तरतूद आहे, एकाच वेळी सर्व रस्ते तयार करणे शक्य होईल का, सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी किती निधी लागणार आहे, असे त्यांनी विचारले.
शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, त्याची अवस्था तसेच इतर अडचणी प्रशासनाला लक्षात याव्यात यासाठी शहर अभियंता कार्यालयाने तीन महिन्यांपूर्वी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दररोज सकाळी दोन तास प्रभागातील रस्त्यांवर फिरून त्याचा सविस्तर अहवाल प्रशासनाकडे देण्याचे आदेश काढले होते. तसेच, रस्त्यांची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी चारचाकी वाहनांऐवजी दुचाकीचा वापर करावा, असे निश्चित केले होते.
त्याची सद्यस्थिती काय? अशा सर्व गोष्टींचा खुलासा करावा, असे आदेश दिले होते. यावर खुलासा करताना शहर अभियंता पावसकर यांनी शहरातील विविध भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. मात्र, हे प्रकल्प प्रत्यक्ष कधी सुरू होतील, यावर काही उत्तर दिले नाही.
‘क्षेत्रीय कार्यालयातील किती अधिकाऱ्यांनी रोज दोन तास रस्त्यावर उतरून पाहणी केली, चारचाकीऐवजी दुचाकीचा वापर करून किती अधिकाऱ्यांनी पाहणी केली,’ असे प्रश्नही महापौर नागपुरे यांनी उपस्थित केले होते. मात्र प्रशासनाने या आदेशाला केराची टोपली दाखवून महापौरांनी विचारलेल्या एकाही मुद्द्यावर खुलासा केला नाही.
महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अपघाताच्या पार्श्वभूमीवर खुलासा करताना चार गोष्टींचा खुलासा करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले होते. मात्र, शेवटपर्यंत त्यावर खुलासा केलाच नाही. शहर अभियंत्याचे बोलणे सुरू असताना कोंढवा भागातील दिवे चोरीचा विषय सभागृहात आला. त्या गोंधळात प्रशासनाने खुलासा केलाच नाही.
