पुणे : ‘महापालिकेकडे केल्या जाणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यासाठी ‘पीएमसी केअर’ अॅपमध्ये आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. महापालिकेबाबत आमदार, खासदार यांच्याकडे केल्या जाणाऱ्या तक्रारींची नोंद महापालिकेकडून घेऊन त्याचे निवारण केले जाईल.

पुणे महापालिकेकडे येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे निवारण होईपर्यंत त्याची सद्यःस्थिती नागरिकांना पाहता येणार आहे. जे अधिकारी, कर्मचारी कमी वेळेत तक्रार निकाली काढतील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस योजना सुरु केली जाईल,’ अशी माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली.

‘शहरातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या पाच रुग्णालयांत आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देताना रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत,’ असे महापौर नागपुरे यांनी सांगितले. महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महापौर म्हणून काम करताना असलेल्या आव्हानांची माहिती तसेच गेल्या महिनाभरात जाणवलेल्या समस्यांबाबत नागपुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्यावेळी त्यांनी बेकायदा बांधकामे, चौकांमध्ये तसेच मुख्य रस्त्यांवर लावले जाणारे जाहिरात फलक, वाहतूक कोंडी, अपुऱ्या आरोग्य सेवा याबाबत भूमिका मांडली. महापौर नागपुरे म्हणाल्या, ‘महापालिकेच्या वतीने नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांमध्ये अनेक त्रुटी आहेत. महापालिकेतील आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी नागरिकांना जावे लागते. यासाठी महापालिकेची पाच रुग्णालये सक्षम केली जाणार असून, त्यामध्ये सर्व अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.’

शहरात अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुणे शहरातील विविध भागात महापालिकेची अनेक रुग्णालय आहेत. मात्र तेथे सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तिथे उपचार घेणे अवघड झाले आहे. नागरिकांना कमी दरात आरोग्य सुविधा देणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे आरोग्य सेवा शब्द करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

महापौर कार्यालयात खासगी कर्मचारी

महापौर कार्यालयामध्ये वरिष्ठ लिपिक, टंकलेखक, शिपाई असे ८ ते ९ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, महापौर कार्यालयाकडे येणाऱ्या तक्रारी तसेच इतर महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वीय सहाय्यक, सचिव, राजशिष्टाचार अधिकाऱ्यांसह कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे कामाला गती मिळावी, यासाठी महापौर कार्यालयात खासगी कर्मचारी नेमले जाणार असल्याचे महापौर मंजूषा नागपुरे यांनी स्पष्ट केले. हे कर्मचारी स्वयंसेवक पद्धतीने काम करणार असून, काही कर्मचाऱ्यांचे वेतन स्वतः देणार असल्याचे नागपुरे यांनी सांगितले.