पुणे : नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावर होत असलेली वाहतूक कोंडीबाबत महापौर मंजूषा नागपुरे यांनी बैठक घेऊन पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. सिंहगड रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा १५ दिवसांत अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत सजगता दाखविणाऱ्या महापौरांनी शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर पडलेले खड्ड्यांबाबतही भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापौर्या केवळ एका भागाच्या मर्यादित नसून त्या संपूर्ण पुणे शहराच्या महापौर आहेत. त्यामुळे शहरातील इतर रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यामध्ये तासनतास अडकून पडणारे वाहनचालक महापौरांना कधी दिसणार? असा प्रश्नही विचारला जात आहे.

शहरातील विविध भागांत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि महापालिकेच्या पथ विभागाचे त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागतात. तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी बैठक घेतली. या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते, तेव्हा वाहतूक पोलिस रस्त्यावर का दिसत नाहीत?, सण, उत्सव, कार्यक्रमांना परवानगी देताना पोलिसांकडून वाहतूक कोंडी आणि ध्वनी प्रदूषणाचा विचार का होत नाही? पोलिसांची काहीच जबाबदारी नाही का? असे प्रश्न उपस्थित करून महापौरांनी वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तसेच, या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सर्वेक्षण करून १५ दिवसांत अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या.

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात ही बैठक झाली. प्रभाग समिती अध्यक्ष सचिन मोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत कुंवर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड, पोलिस निरीक्षक सुनील गवळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियंका गोरे, सचिन पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे गटनेते काका चव्हाण, प्रसन्न जगताप, हरिदास चरवड यांच्यासह इतर नगरसेवक या वेळी उपस्थित होते.

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, सिंहगड रस्त्यावरीव वाहतूक कोंडीबाबत महापौर मंजूषा नागपुरे यांनी बैठक घेतली, ही आनंदाची गोष्ट आहे. शहरातील अनेक भागांतही दररोज वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देखील महापौरांनी पुढाकार घेतला पाहिजे. महापौरांनी यामध्ये भूमिका घेतल्यास शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे अपेक्षा आहे व्यक्त केली.