पुणे : पुणेकरांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत आंदोलन केले. या वेळी महापौर मंजूषा नागपुरे यांना ‘वॉटर प्युरिफायर’ भेट देऊन खडकवासला धरण परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. विरोधी पक्षाने केलेल्या या आंदोलनामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापले होते.

विरोधी पक्षनेते नीलेश निकम, नगरसेवक वैशाली बनकर, सुहास टिंगरे, अमोल बालवडकर, नंदिनी धेंडे, रवी टिंगरे हे नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले. नगरसेवक बालवडकर यांनी तीन दिवसांपूर्वी खडकवासला धरण परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली. त्या वेळी गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, सिंहगड पायथा, खानापूर, मांडवी आणि कुडजे परिसरातील काही हॉटेल्स, तसेच फार्म हाऊस व्यावसायिक त्यांचे सांडपाणी सर्रासपणे जलस्रोतांमध्ये सोडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

या भागातील खासगी मालमत्तांमधून मोठ्या प्रमाणात सांडपाणी खडकवासला धरणात सोडले जात असल्याने हेच पाणी महापालिकेला मिळते. या सर्व प्रकारामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले असल्याचा आरोप केला जात आहे.

या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेवकांनी आंदोलन करून पुणेकरांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी द्यावे, अशी मागणी केली. या वेळी महापौर नागपुरे यांना ‘वॉटर प्युरिफायर’ भेट देण्यात आला. ‘सुरक्षित आणि शुद्ध पाणी मिळणे पुणेकारांचा मूलभूत अधिकार असून, धरण परिसरातील सांडपाण्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे,’ अशी मागणी आंदोलकांनी केली.

‘धरण परिसरात सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करावी, प्रक्रिया न केलेले सांडपाणी जलस्रोतांमध्ये सोडणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी. शहराला सुरक्षित पाणीपुरवठा होत असल्याची खात्री करावी,’ अशी मागण्याही या वेळी करण्यात आली.

मग पालकमंत्र्यांनाही ‘फ्युरिफायर’ भेट द्या : भाजप

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने महापौर नागपुरे यांना ‘फ्युरिफायर’ भेट देण्याच्या मुद्द्यावर भाजपचे नगरसेवक पुनीत जोशी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. ‘पुणे शहराला दूषित पाणीपुरवठा होण्यास जिल्ह्यातील उद्योग जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे महापौरांना ‘वॉटर प्युरिफायर’ भेट देण्याऐवजी प्रथम जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘वॉटर प्युरिफायर’ भेट द्यावा,’ अशी मागणी त्यांनी केली.