पुणे : पुण्यातील ३६०० कोटी रुपयांच्या मेफेड्रोन तस्करी प्रकणातील मुख्य सूत्रधार विरेंदरसिंह बसोया उर्फ वीरु याचे संयुक्त अरब अमिरातीतून प्रत्यार्पण करण्यात आले. बसोया याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २१ ऑगस्टपर्यंत ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या (एनसीबी) कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले. बसाेया हा आंतराष्ट्रीय स्तरावरील १३ हजार कोटी रुपयांची मेफेड्रोन तस्करीतील प्रमुख आरोपी आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ ओैद्योेगिक वसाहतीतील एका कारखान्यावर छापा टाकून तीन हजार ६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोान जप्त केले होते. कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील कारखान्यात तयार करण्यात आलेले मेफेड्रोन पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू या शहरात विक्रीस पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मेफेड्रोन लंडनमध्ये पाठविण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले होते. पोलिसांनी पुणे आणि दिल्लीतून एक हजार ८३७ रुपये किलो मेफड्रोन जप्त केले होते. दिल्लीतून जप्त केलेले ३६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकणात पुणे पोलिसांनी १६ जणांना अटक केली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर मुख्य सूत्रधार बसोया हा फरार झाला होता.
या प्रकरणाची व्याप्ती विचारात घेऊन पुणे पोलिसांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई कार्यालयाकडे तपास सोपविला होता. मुख्य सूत्रधार बसोया हा दिल्लीतील फरार अमली पदार्थ तस्कर संदीप धुनिया याच्या संपर्कात होता. धुनियाच्या माध्यमातून लंडनमध्ये मेफेड्रोन विक्रीसाठी पाठविण्यात आले होते. फरार झाल्यानंतर बसोया हा दुबईत वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली होती. ‘एनसीबी’ने बसाेयाला ताब्यात घेण्यासाठी इंटरपोलमार्फत रेड काॅर्नर नोटीस बजाविली होती. जून महिन्यात त्याला संयुक्त अरब अमिरातीतून ताब्यात घेण्यात आले होते. प्रत्यार्पणाची प्रक्रिया पार पाडून त्याला १४ ऑगस्ट रोजी भारतात आणण्यात आले. दिल्लीतील पटियाल हाऊस न्यायालयाने त्याला तीन दिवसांची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मंजूर केली होती.
संदीप धुनिया पसार ?
कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील कारखान्यात तयार करण्यात आलेले मेफेड्रोन लंडनमध्ये संदीप धुनियाने पाठविले होते. या प्रकरणात पुणे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर धुनिया हा नेपाळमार्गे परदेशात पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली होती. दिल्ली पोलिसांनी आंतराष्ट्रीय स्तरावरील १३ हजार कोटी रुपयांची अमली पदार्थ तस्करी उघडकीस आणली होती. धुनियाशी बसोयाचे निकटचे संबंध असल्याची माहिती तपासात मिळाली होती.
