पुणे : पुणे जिल्ह्यातील हडपसर, फुगेवाडी आणि पिंपरी-चिंचवड भागात गावठी दारूतील मिथेनॉलच्या भेसळीमुळे झालेल्या मृत्यूंनी संपूर्ण राज्य हादरले. या गंभीर घटनेची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने आता राज्यातील सर्व मिथेनॉल उत्पादक आणि पुरवठादारांविरुद्ध एक व्यापक व दीर्घकालीन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १०० मिथेनॉल कंपन्या रडारावर आल्या आहेत.
या घटनेत १६५ लिटर मिथेनॉल ऑनलाईन खरेदी करण्यात आले होते. रसायनांच्या ऑनलाइन विक्रीवर अंकुश नसल्याचा मुद्दा त्यामुळे पुन्हा ऐरणीवर आला. या मोहिमेद्वारे कंपन्यांच्या विक्री नोंदींची कसून तपासणी केली जाणार असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. मात्र, ही कारवाई केवळ एका प्रकरणापुरती मर्यादित न ठेवता, अन्न व औषध प्रशासनाने आता राज्यभरातील सर्व मिथेनॉल उत्पादक आणि पुरवठादारांविरुद्ध व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
पुणे जिल्ह्यातच जवळपास १०० परवानाधारक मिथेनॉल कंपन्या आहेत. औषध निर्माण प्रक्रियेत मिथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, मात्र, या रसायनाचा दुरुपयोग वाढल्याने प्रशासनाने कंबर कसली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रशासन नोंदींची पडताळणी करत आहे. कायद्यानुसार सर्व कंपन्यांना मिथेनॉलची खरेदी-विक्री आणि साठवणुकीच्या नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. कंपन्या औषध निर्माणाव्यतिरिक्त कोणाला बेकायदा मिथेनॉल विकत आहेत का, याची सखोल चौकशी केली जात आहे. ही तपासणी मोहीम काही काळापुरती मर्यादित नसून, ती दीर्घ काळ चालणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कंपनीवर कठोर कारवाई करण्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मिथेनॉलचा वापर कुठे होतो?
मिथेनॉल रसायनाला ‘वूड अल्कोहोल’ असेही म्हणतात. हे जीवघेणे रसायन आहे. याचा वापर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असला, तरी ते मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. मिथेनॉलचा वापर औषधनिर्माण, रसायननिर्मिती, ॲसिटिक ॲसिड आणि इतर अनेक रसायने तयार करण्यासाठी होतो. इंधन, प्लास्टिक आणि पेंट उद्योग, रेझिन, पेंट्स, डिंक आणि सॉल्व्हंट्स, स्वच्छता उत्पादने या क्षेत्रांतही मिथेनॉल मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
चौकट
मनुष्यबळाची कमतरता हेच मोठे आव्हान
अन्न व औषध प्रशासनाने मिथेनॉल उत्पादक, पुरवठादारांची तपासणी मोहीम उघडली असली, तरी अशी तपासणी करण्यासाठी पुणे जिल्ह्यात केवळ आठच कर्मचारी आहेत. आवश्यक मनुष्यबळापेक्षा जेमतेम २० टक्केच मनुष्यबळ असल्याची खंत अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकारे यांनी व्यक्त केली. त्यामुळे या मोहिमेत तपासणीसाठी मोठा कालावधी लागेल, असे त्यांनी नमूद केले.
ऑनलाइन औषधविक्रीप्रमाणेच रसायनांची विक्रीही घातक आहे. अशा विक्रीला विरोध केला असून, यासाठीच आम्ही आंदोलन केले होते. मिथेलॉनमिश्रित गावठी दारूमुळे जे बळी गेले, ते सरकारच्या निष्क्रीय धोरणामुळेच आहेत. ऑनलाइन विक्रीवर योग्य वेळी बंदी आणली असती, तर ही वेळ आली नसती. मिथेलॉनप्रमाणेच अनेक घातक रसायने आणि औषधे आहेत, की ज्यांची सर्रास विक्री होत आहे. यावर बंदी आणावी, यासाठी आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. – जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष, द ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन
