पुणे : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत येत्या काही वर्षात दोनशे किलोमटीर लांबीचे मेट्रो मार्गांचे जाळे उभारण्यात येणार असून, त्या संदर्भात नियोजन सुरू आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. ‘नागरी विकासाचा विचार करून ‘महामेट्रो’ आणि नगरविकास विभागाने मेट्रोचे जाळे उभारण्याचे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल,’ असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पुणे मेट्रो प्रकल्पाचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मंजूषा नागपूरे, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभा खासदार प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने, योगेश टिळेकर, बापू पठारे यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘शहरात ३३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. याशिवाय, पुणे महागनर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे मेट्रोचे जाळे ५६ किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय, नव्याने ५५ किलोमीटरचे काम सुरू असून, ८० किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित आहे. भविष्यात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेल्या दोनशे किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे विकसित केले जाईल.’
‘शहराचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता या दोनशे किलोमीटर लांबीचे जाळे करण्यासाठीचे नियोजन तातडीने पूर्ण करावेत. या सर्व मार्गांचे सविस्त प्रकल्प आराखडे एकत्रितपणे तयार करावेत. भविष्यातील ग्रोथ सेंटर, नवीन विमानतळ, औद्योगिक क्षेत्रे आणि वाढती उपनगरे यांचा विचार मेट्रोचे जाळे विकसित करताना करावा,’ अशी सूचनाही फडणवीस यांनी केली.
चौकट
‘पुणे मेट्रो भवन प्रगतीचे प्रतीक’
‘पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नसून, आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे,’ असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य नियोजनाचा हा उत्तम नमुना आहे. पर्यावरणाशी सुसुंगत पद्धतीने भवनाची उभारणी करण्यात आली आहे. महायुती सरकारने रिंग रोड, सेवा रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, मेट्रोसारखे प्रकल्प राबवून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. स्वारगेट-कात्रज, पिंपरी-चिंचवड-भक्तीशक्ती चौक, वनाज-चांदणी चौक, रामवाडी-वाघोली, खडकवासला-खराडी, वारजे-नळस्टाॅपसह हडपसर-सासवड आणि हडपसर-लोणी काळभोर या महत्त्वाच्या मार्गांना गती दिली जाणार आहे. भविष्यात पुणे विमानतळ आणि चाकण एमआयडीसी यांनाही मेट्रो मार्गाने जोडण्याचे विचाराधीन आहे.’
- एकूण क्षेत्रफळ – सुमारे ८,१५० चौरस मीटर
- अनुभव केंद्रात पुणे मेट्रोचे जाळे व प्रकल्पाची मॉडेल्स
- सभागृहाची ३१२ जणांसाठीची आसनक्षमता; बॅकअप संचालन नियंत्रण केंद्र
- सिग्नलिंग आणि दूरसंचार सुविधा
- नैसर्गिक प्रकाश, ऊर्जा कार्यक्षम व पर्यावरणपूरक रचना
