पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनने (महामेट्रो) प्रवाशांच्या शिस्तबद्ध आणि सुरक्षित प्रवासासाठी; तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना रोखण्यासाठी स्थानकांवर स्वयंचलित फाटक यंत्रणा (ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन -एएफसी) या अद्ययावत प्रणालीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वैध तिकीट किंवा कार्ड यंत्रणेला कार्ड दाखवल्यानंतरच (स्कॅन) पुढील प्रवासासाठी दरवाजे उघडले जाणार आहेत.

‘महामेट्रो’च्या स्थानकांवरील ‘एएफसी’ फाटकाबाबत अनेकांच्या तक्रारी होत्या. तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या रांगा लागत असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर ‘महामेट्रो’ने या तंत्रज्ञान प्रणालीत सुधारणा केली आहे.प्रवासी समाेर आल्यानंतर व्यवस्थित कागदी तिकीट किंवा मोबाईलवर प्राप्त होणारा क्यूआर कोड अथवा मेट्रो कार्ड यशस्वी स्कॅन केल्यानंतरच दरवाजे उघणार आहेत. त्यानंतर प्रवाशाला आत किंवा बाहेर येणे शक्य होणार आहे, असे ‘महामेट्रो’कडून स्पष्ट करण्यात आले.

तसेच एका वेळी एकच प्रवासी या यंत्रणेसमोर येणार असून एकदा यशस्वी स्कॅन झाल्यानंतर पुन्हा ही फाटके स्वयंचलित पद्धतीने बंद होतील. नव्याने स्कॅन केल्यावर पुन्हा स्वयंचलित पद्धतीने प्रवाशाला सहाय्य करतील. यामुळे तिकीट नसलेल्या प्रवाशांना रोखता येणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर मेट्रोच्या कारभारात पारदर्शकता आणि अचूकता प्राप्त होणार आहे, असेही ‘महामेट्रो’ने नमूद केले.

तिकीट नसल्यास, चुकीचे तिकीट असल्यास सहज समजणार आहे. तसेच बाहेर पडताना किंवा स्थानकामध्ये प्रवेश करताना संबंधित प्रणालीवर दबाव टाकला, किंवा अनधिकृत प्रवेश करण्यासाठी भाग पाडल्यास तातडीने माहिती समजणार आहे. हा बदल प्रवासी व्यवस्थापन सुधारण्यासाठी, अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी आणि भाडे चुकवण्याच्या घटना कमी करण्यासाठी करण्यात आला आहे. आता ही प्रणाली दिल्ली, मुंबई यांसारख्या इतर प्रमुख मेट्रो सिस्टमप्रमाणे अधिक सुरक्षित आणि प्रभावी झाली आहे.

मुख्य उद्देश

प्रवाशांकडून तांत्रिक बिघाडामुळे रांगा लागणे, गर्दी आणि अनधिकृत प्रवेशाच्या तक्रारी होत्या. हे बदल दिल्ली-मुंबई मेट्रोप्रमाणे अधिक सुरक्षित आणि प्रभावी प्रणाली लागू करण्यासाठी केले. विनातिकीट प्रवास पूर्णपणे रोखणे आणि प्रवासी व्यवस्थापन सुधारणे, हा मुख्य उद्देश आहे, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

‘महामेट्रो’ची कार्यक्षमता आणि कारभारातील पारदर्शकता अचूक, सुलभ करण्यासाठी तसेच प्रवासी व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रवाशांनी या नव्या नियमाची काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी आणि तिकीट स्कॅन करणे विसरू नये.

  • चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो, पुणे</li>