पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवासी सेवा सुरू झालेल्यास एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मार्ग विस्तार रखडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही शहरातील विस्तारीत सेवा अद्यापही सुरू झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान,  दिवाणी न्यायालय, जंगली महाराज रस्ता, नामदार गोपालकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), शिवाजीनगर, पुणे महानगरपालिका, पुणे रेल्वे स्थानक, प्रादेशिक परिवहन विभाग आणि रुबी हॉल लवकरच मेट्रोने जोडले जातील, असा विश्वास महामेट्रोकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> ‘नाफेड कांदा-खरेदी’प्रश्नी सरकारचा खोटारडेपणा उघड; काँग्रेस प्रवक्ता गोपाळ तिवारी यांचा आरोप

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किलोमीटर) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किलोमीटर) असे ३३ किमी लांबीचे दोन मार्ग आहेत. त्यापैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक या सात किलोमीटर अंतरावर आणि वनाज स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक या पाच किलोमीटर या मार्गावर प्रवासी सेवा गेल्या वर्षा सहा मार्च रोजी सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रवासी सेवा सुरू करण्यात आली. मात्र वर्षभरात विस्तारीत प्रवासी सेवा महामेट्रोला पूर्ण करता आलेली नाही. तसेच प्रवासी संख्या दिवसेंदिवस घटत असून आता मेट्रोलो प्रवाशांची प्रतिक्षा असल्याचे दिसून येत आहे.

मेट्रोच्या उर्वरित मार्गिकवर अत्यंत वेगाने काम सुरु असून लवकरच फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक, गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल या मार्गिकेची कामे लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन पुणे मेट्रोने केले आहे. या मार्गिकेची कामे मार्च २०२३ अखेर पूर्ण केली जातील. त्यानंतर रेल संरक्षा आयुक्त  यांचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणांची पूर्तता केल्यानंतर हे तीन मार्ग प्रवाशांसाठी खुले होतील, असे महामेट्रोकडून जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> विधवा ऐवजी पूर्णांगी शब्द वापरण्यात यावा; राज्य महिला आयोगाची राज्य सरकारकडे शिफारस

फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गावर दापोडी, बोपोडी आणि शिवाजीनगर या स्थानकांची कामे ९५ टक्के पूर्ण झाली असून या मार्गांवर आधीच मेट्रोची चाचणी घेण्यात आली आहे. या मेट्रो मार्गिकमुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे हि दोन जुळी शहरे थेट जोडली जाणार आहेत. गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गिकवर डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका या महत्वाच्या स्थानकांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. या मार्गिकांमुळे पौड रस्ता येथील शहराचा भाग हा दिवाणी न्यायालय, जंगली महाराज रस्ता, ना. गोपालकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), शिवाजीनगर, पुणे महानगरपालिका यांना थेट जोडला जाणार आहे. त्याचप्रमाणे या भागातील रहिवासी नागरिकांना सहजपणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भोसरी या भागातील औद्योगिक पट्ट्यामध्ये प्रवास करण्यासाठी मेट्रो मार्गिका उपलब्ध होणार आहे.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल, मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्थानक येथील मेट्रो स्थानकांची कामे जवळपास पूर्ण झाली आहे. या मार्गिकमुळे पिंपरी चिंचवड आणि पौड रस्ता, कर्वे रस्ता येथील नागरिकांना थेट पुणे रेल्वे स्थानक, प्रादेशिक परिवहन विभाग,  विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, पुणे पोलीस आयुक्तालय येथे जाणे सुलभ होणार आहे.

हेही वाचा >>> खचून न जाता पुढील निवडणुकांच्या तयारीला लागा; शरद पवार यांची कार्यकर्त्यांना सूचना

या नवीन मार्गिकांमुळे विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे. वाडिया महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, एमआयटी महाविद्यालय, मॉर्डन महाविद्यालय, बीएमसीसी महाविद्यालय, एमएमसीसी महाविद्यालय, आगरकर इन्स्टिटयूट, गोखले इन्स्टिट्यूट, रानडे इन्स्टिटयूट, एफटीआयआय, विधी महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे. दिवाणी सत्र न्यायालय शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. न्यायालयाच्या कामासाठी येथे दिवसभरात ३० हजार ते ४० हजार नागरिक येत असतात. तसेच पुणे रेल्वे स्थानकात २४ तासात १ लाखहून अधिक नागरिक भेट देत असतात. यासर्वांना मेट्रो अतिशय उपयोग होणार आहे. या दोन्ही ठिकाणी लांबून येणाऱ्या प्रवाश्यांचा मेट्रोमुळे प्रवास सुकर होणार आहे. तसेच त्याभागातील वाहतुक कोंडी आणि पार्कींगची समस्या सुटण्यासाठी मेट्रो उपयोगी पडेल, असा दावा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केला आहे.