पुणे : वनाज ते गरवारे महाविद्यालय स्थानकादरम्यान प्रवासी संख्या वाढवण्यासह कोथरूड परिसरातील वाहतूक सुधारणांसाठी ‘महामेट्रो’ने ‘पुणे नॉलेज क्लस्टर’कडून ६४ लाख ९० हजार रुपयांचा सल्ला घेतल्याचे समोर आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते तुषार रत्नपाल यांनी ‘महामेट्रो’कडे माहिती अधिकारात ही माहिती विचारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनाज ते गरवारे महाविद्यालय स्थानकादरम्यान पहिल्या मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी मेट्रोकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून वनाज ते गरवारे महाविद्यालय स्थानकांदरम्यान वाहतुकीचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी सल्लागार म्हणून ‘पुणे नॉलेज क्लस्टर’ या स्वयंसेवी संस्थेची नेमणूक करण्यात आली. त्यासाठी ३० जून २०२५ रोजी ६४ लाख ९० हजार रुपयांचा करार करण्यात आला. या करारानुसार कोथरूड परिसरातील वाहतूक सुधारणा आणि मेट्रोची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी ‘पुणे नॉलेज क्लस्टर’ने वेगवेगळ्या उपाययोजना-धोरणनिर्मिती करणे अपेक्षित होते.
‘या कराराला एक वर्ष पूर्ण होत असून, वनाज ते गरवारेदरम्यान प्रवाशांची वाढ झाली का, संस्थेने केलेल्या सर्वंकष अभ्यासाचा नेमका काय उपयोग झाला, या प्रश्नांची उत्तरे मेट्रो प्रशासनाने द्यायला हवीत. तसेच, अभ्यासासाठी करण्यात आलेल्या खर्चाचा तपशीलही मेट्रोने जाहीर करायला हवा,’ असे रत्नपाल यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘मेट्रोची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी ‘महामेट्रो’कडून सातत्याने प्रयत्न होणे अपेक्षित आहे. मात्र, ठराविक मेट्रोस्थानकांवरच लक्ष केंद्रित करून आधीच तोट्यात असलेल्या ‘महामेट्रो’ने सल्लागाराला लाखो रुपये देणे अनाकलनीय आहे. तसेच, प्रवाशांना अंतिम गंतव्य स्थानापर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या-संस्थांशी करार करण्यात आले आहेत. मात्र, अजूनही गंतव्य ठिकाणी पोहोचणे बिकट असल्याचेच चित्र आहे.’
कोणती कामे करण्यात आली ?
‘पुणे नॉलेज क्लस्टरने वाहतूक सुधारणेसाठी सर्वसमावेशक उपाययोजना सुचवल्या. त्यानुसार तीन मेट्रो स्थानकांवर सायकल पार्किंग उभारण्यासह जनजागृती कार्यक्रम करण्यात येत आहेत. तसेच, पादचारी सुविधा सुधारण्यासाठी पुणे महापालिकेला विनंती केल्याची माहिती ‘महामेट्रो’कडून माहिती अधिकार अर्जाच्या उत्तरात देण्यात आली आहे.
‘वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर’
‘पुणे नॉलेज क्लस्टर’ने अभ्यास अहवाल सादर केला असून, त्यानुसार वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचा परिणाम दिसण्यास आणखी काही कालावधी लागेल. आता काही स्थानकांवर सायकल स्टँड, जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले आहेत,’ अशी माहिती ‘महामेट्रो’चे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर यांनी दिली.
